निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या मांडवड गावातील भारतीय सैन्यातील एका जवानाला लडाखमध्ये वीरमरण आलं आहे. कर्तव्यावर असताना नाशिकचा हा सुपुत्र शहीद झाला आहे. नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील संदीप भाऊसाहेब मोहीते (33) यांस लेह येथे वीरमरण आले. जवान संदीप मोहितेंचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संदीप मोहितेंच्या निधनाने नाशिकवर शोककळा पसरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्करातील लेह येथील 105 इंजिनियर रेजिमेंटचे भाग असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे मांडवड नांदगाव येथील आहेत. मोहिते यांना लेह येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. संदीप मोहिते यांच्या निधनाने मांडवड गावावर शोककळा पसरली आहे. कर्तव्यावर बजावत असतांना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. त्यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.


कसा झाला अपघात?


पुतण्याचे अकाली निधन झाल्याने संदीप मोहिते हे जानेवारी महिन्यात सुट्टीवर गावी आले होते. गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी त्यांनी रेजिमेंट जॉईन केली. सुट्टी संपवून कर्तव्यावर परतल्याच्या पहिल्याच दिवशी बर्फ हटवण्याचे काम करत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


संदीप मोहिते लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना मशीन ऑपरेटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. त्यांना तात्काळ तिथल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आले. मात्र तपासणीनंतर मोहिते यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांकडून देण्यात आली. 


दरम्यान, संदीप मोहिते हे 2009 मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात असताना विविध ठिकाणी कर्तव्य बजावले. चंदीगड, आसाम, पठाणकोट, अरुणाचल प्रदेश, लेह लद्दाख या ठिकाणी तसेच विदेशात साउथ सुदान या ठिकाणी ही देशाचे नेतृत्व केले होते. संदीप यांचा लहान भाऊ श्रीकांत हा सुद्धा भारतीय लष्करात जयपूर येथे कार्यरत आहे. संदीप यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.