योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  मुंबई महामार्गावर इगतपुरी (Igatpuri) जवळ दोन चार चाकी वाहनांचा अपघात (Accident) झाला, हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात धुळ्यात राहाणाऱ्या 31 वर्षांच्या मनीष सनेर  याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. उपचारादरम्यान मनीष कोमात गेला आणि त्याचा मेंदू मृत अवस्थेकडे गेल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर मनीषला नाशिकमधल्या अपोलो हॉस्पिटल हलवण्यात आले. त्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या आणि सर्व रिपोर्ट्स बघून अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड (Brain Dead) घोषित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार दिवसांपूर्वीच भरला होता अवयदानाचा फॉर्म
विशेष म्हणजे अपघाताच्या चार ते पाच दिवस आधीच मनीषने अवयव दानाचा फॉर्म (Organ Donation) भरला होता आणि त्याचं डोनर कार्डही त्याच्या घरी कुरिअरने आलं होतं. त्यामुळे मनीष च्या आई-वडिलांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. अवयव दानासाठी मनीषच्या नातेवाईकांची सहमती असल्याने अवयव दानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाच्या ZTCC या अवयवदान कमिटीला कळविण्यात आले आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 


अपोलो हॉस्पिटलमध्ये लगेचच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहन पटेल म्हणाले 'अवयव दानाची सगळ्यात जास्त गरज भारतात आहे. नाशिकमध्ये अवयव दानाचं प्रमाण अत्यंत कमी आहे'. वयाच्या 31 व्या वर्षी मनीषची अवयव दानाची इच्छा होती आणि दुर्दैवाने त्याचा अपघात झाला आणि तो ब्रेन डेड अवस्थेत गेला. त्याच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी अवयव दानाची सहमती दिली, ही खूप मोठी गोष्ट आहे. अवयवदान हे सर्व श्रेष्ठ दान असून समाज प्रबोधनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मनीषच्या घरच्यांनी उचललेला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


ब्रेन डेड कमिटी स्थापन
आरोग्य संचनालयाकडून अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे ब्रेन डेथ कमिटी नियुक्त करण्यात आली असून त्यामुळे अपोलो हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया सुलभपणे पार पडली अशी माहिती अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा यांनी दिली. अवयव दान केल्याने 9 रुग्णांना नवीन जीवन मिळतं. सुयश हॉस्पिटल मधील अस्थिविकार तज्ञ डॉ.प्रशांत पाटील आणि डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी अपोलो हॉस्पिटल ला संपर्क केला , अवयवदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत अपोलो हॉस्पिटल मधील आयसीयू विभागाचे डॉ. अतुल सांगळे,डॉ. अमोल खोळमकर,डॉ. प्रविण ताजने, मेंदुविकार तज्ञ डॉ.जितेंद्र शुक्ल, फिजिशिअन डॉ.शीतल गुप्ता आणि डॉ. राजश्री धोंगडे , भुल तज्ञ डॉ. चेतन भंडारे जनरल सर्जन डॉ. मिलिंद शहा , मूत्रविकार व शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. प्रवीण गोवर्धने , डॉ. किशोर वाणी , हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अभयसिंग वालिया, मेंदू व मणके शास्त्रक्रिया तज्ञ डॉ. संजय वेखंडे आणि अवयव प्रत्यारोपण समन्वयक सौ. चारुशीला जाधव यांनी अथक परिश्रम घेतले आणि अवयव दानाची प्रक्रिया सुखरूपपणे पार पाडली.


मनीषनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय आणि त्याच्या आई-वडिलांनी अत्यंत दुःखाच्या क्षणी अवयावदानाबद्दल दाखवलेली सकारात्मकता बघता मनीषला मानवंदना देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते