चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : बळीराजासोबत शेतात राबणाऱ्या बैलांसाठीचा (Bull) पोळ्याचा सण आज राज्यात साजरा केला जात आहे. मात्र यंदा असलेली दुष्काळी (Drought) परिस्थिती तसेच गुरांना होणार लम्पी आजार याचा बैलपोळ्यावर सावट आहे. राज्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस देखील झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या लाडक्या सर्जाला अंघोळ घालायलाही पाणी नसल्याने शेतकऱ्याने त्यांना थेट कार वॉशिंग सेंटवर (Washing Centar) नेले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैलपोळा सणाला सर्जा-राजाला सजवण्या अगोदर अंघोळ घालण्यात येते. मात्र विहिरींना पाणीच शिल्लक नसल्याने अक्षरशः येवल्यात शेतकऱ्यांनी सर्व्हिस सेंटरवर आपले बैल जोडी धुण्यासाठी आणल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे. ज्या ठिकाणी गाड्या धुतल्या जातात त्या ठिकाणी आता पोळ्याला बैलाला अंघोळ घातली जात आहे.


पाऊस नसल्याने विहीरीत पाणीच उरलेलं नाही. त्यामुळे बैलपोळा साजरा करण्यासाठी आम्ही बैलांना सर्व्हिस सेंटरवर घेऊन आलो आहोत अशी माहिती जनार्दन जेजुरकर या शेतकऱ्याने दिली.


 



पोळा सणावर दुष्काळाचे सावट


वर्षभर बळीराजाच्या शेततात राबणाऱ्या लाडक्या सर्जा - राजाप्रति ऋण व्यक्त करणारा बैलपोळा सणावर यंदा नाशिकच्या मालेगाव,मनमाड व नांदगाव परिसरात दुष्काळाचे सावट आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपाची संपूर्ण पिके वाया गेली आहेत. धरणांमध्ये पाणी नाही, नदी - नाले व विहिरी कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांच्या चारा - पाण्याचा प्रश्न उभा आहे. अशा परिस्थितीत बैलपोळा कसा साजरा करायचा? असा सवाल शेतकऱ्याकडून केला जात आहे.


हातात पैसे राहिले तरच बैलांसाठीचे साहित्य खरेदी करता येते, लाडक्या सर्जा - राजाला सजवता येते. मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने काहीच शक्य होतं नाहीये. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. एकेकाळी धरणात मनसोक्त बैलांना डुंबून आणणारा शेतकरी घरातील आज बादलीभर पाण्याने बैलांना अंघोळ घालतोय.