ती फेसबूकवर तुम्हाला नको ते दाखवते आणि नंतर तुम्हाला लुटते? कसं ते पाहा
सावध मित्रा, ती फेसबूकवर फ्रेन्ड होते, चॅट करते, नंतर नको ते दाखवते, व्हीडिओ रेकॉर्ड करते आणि त्यानंतर...
नाशिक : फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा सोशल साईट सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण आपला बराचवेळ या सोशल साईटवर घालवताना दिसतात. यातही 20 ते 30 वयोगटातील तरुणावर्ग सोशल मीडियाचा जास्त वापर करतात.
सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकाच त्याचा दुष्परिणामही आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून फसवणूकीच्या गुन्हांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. असंच एक प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिकमध्ये एका तरुणाला गंडवण्यात आलं.
तरुणाची अशी झाली फसवणूक
पूनम शर्मा नामक एका महिलेच्या फेसबुक अकाउंटवरून नाशिक मधील एका तरुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. या मुलानेही फ्रेड रिक्वेस्ट स्वीकारली. त्या मुलीने या तरुणासोबत काही दिवस चॅटिंग करत ओळख वाढवली. पुढे या मुलीने त्याचा मोबाईल नंबर मागितला. त्यानेही पुढचा-मागचा विचार न करता तिला आपला मोबाईल नंबर दिला.
फेसबुकवर सुरु झालेली चॅटिंग आता व्हॉट्सअॅपवर सुरु झाली. या दोघांमध्ये अश्लिल चॅट सुरु झाले. त्या तरुणानेही त्याला प्रतिसाद दिला. याचाच फायदा घेत मुलीने त्या तरुणाला मोबाईलवरुन व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्यासमोर विवस्त्र झाली. तरुणालाही अश्लील कृत्य करण्यासाठी उत्तेजित केलं. आणि इथेच हा तरुण फसला.
हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करुन त्या मुलीने तरुणाला पाठवला आणि यानंतर सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ. मुलीने त्या तरुणाकडे पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली.
अशा घटनांमध्ये हल्लीच्या काळात मोठी वाढ झाली आहे. बदनामी होऊ नये यासाठी अनेकजण पोलिसांता तक्रार करत नाहीत. याचाच फायदा या महिला घेतात.
सोशल मीडियावर येणारी प्रत्येक रिक्वेस्ट तपासून घेणे तसेच आपल्या फ्रेंड लिस्ट पैकी सदर महिलेच्या फ्रेंड लिस्ट मध्ये कोणी आहे का याची खात्री करून मगच रिक्वेस्ट स्वीकारण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. तर पालकांनी सुद्धा मुलाला दिलेल्या मोबाईलचा वापर योग्य कामासाठी होत आहे का याची खात्री वारंवार करत राहणे गरजेचं आहे.