योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : ब्रह्म पुराणातील उल्लेखानुसार किस्किंदा सोबत नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी सुद्धा हनुमानाची जन्मभूमी असल्याचं शास्त्रार्थ सभेचे अध्यक्ष गंगाधर पाठक यांनी जाहीर केलं. जाहीर करत असताना  गोविंदानंद यांनी हनुमानाचा जन्म ठिकाण सिद्ध करण्याचा दुराग्रह सोडून द्यावा असा सल्लाही दिला. 


नाशिकमध्ये पार पडलेल्या शास्त्रार्थ सभेचा निष्कर्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राम जन्मभूमी न्यासाचे अयोध्येचे गंगाधर पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना 28 युगामध्ये अनेक वेळेस भगवान श्रीराम यांचा जन्म झाला असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जानकी आणि हनुमानाचा ही जन्म वेगवेगळ्या ठिकाणी झाला असल्याचे सांगितले. 


वर्तमान काळातील वाल्मिकी रामायणानुसार हनुमानाचा जन्म किस्किंदामध्ये झालाय. तर ब्रह्म काळात कल्पयुगात हा जन्म अंजनेरीमध्ये सुद्धा झालेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ब्रह्म पुराणातील हा उल्लेख  असतांना त्याला नाकारण्या इतपत मी मोठा नाही, असे सांगत त्यांनी सुवर्णमध्य साधत नाशिकरांचे समाधान केले. हा प्रश्न उपस्थित करणारे गोविंदानंद मात्र अद्याप हा तर्क मानण्यास तयार नाही. प्रश्नकर्ता आणि त्यांना उत्तर देणारे नाशिककर साधू महंत यांच्यामध्ये न्यायाधीश म्हणून गंगाधर पाठक यांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे पाठक यांनी हा निर्णय दिल्यामुळे नाशिककरांमध्ये आनंद व्यक्त होतोय.


गोविंदानंद आपल्या मतावर ठाम


गोविंदानंद यांनी आपला तर्क मात्र कायम ठेवला. गोविंदानंद यांनी किस्किंदा हीच हनुमानाची जन्म नगरी असल्यावर ठाम राहात अंजनेरी हे जन्मस्थळ मान्य करण्यास नकार दिला. ब्रह्म पुराणात उल्लेख असला तरी त्यावेळी त्यांचे आईवडील कोण होते त्यांच्या जन्माची तिथी काय सुग्रीव इतर रामायणातले सर्व पात्र कुठे होती, असा सवाल त्यांनी यावेळी केला. याविषयीची सखोल माहिती मिळाल्यास पुरावे घेऊन शंकराचार्यांकडे जावे, त्यांनतर अंजनेरी जन्मस्थळ असल्याचा दाखला घ्यावा असे त्यांनी यावेळी नाशिककरांना आवाहन केले.


जन्मस्थळाचा निर्णय


कर्नाटकातील किस्किंदा सोबत अंजनेरी जन्मस्थळ आहे. हे जाहीर करण्याचा हक्क शंकराचार्यांचा आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या भागाचे शंकराचार्य द्वारका पीठाचे स्वरूपानंद सरस्वती हे आहेत. त्यामुळे या शास्त्रार्थ सभेचा निर्णय आता त्यांच्यासमोर ठेवला जाईल. त्यानंतर सर्व दाखले तपासल्यानंतर शंकराचार्य याबाबत निर्णय देऊ शकतील. खऱ्या अर्थानं तसा अंजनेरी जन्मस्थळ असल्याचा राष्ट्रीय स्तरावरील धार्मिक दाखला देण्याचा अधिकार केवळ शंकराचार्यांनाच आहे हे देखील पत्रकार परिषदेत अखेरीस जाहीर करण्यात आले. 


 Nashik news shastrartha sabha decision on birth of lord hanuman and related controversy