योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यातला शेतकरी शेतमालाला (Agricultural Goods) भाव नसल्यामुळे आधीच हवालदिल झालाय. हे कमी होतं म्हणून की काय आता खतं (Fertilizer) विक्रेत्यांनी बळीराजाचे लचके तोडायला सुरूवात केलीय.  पावसानं जोर धरल्यानं सर्वत्र भात लावणीला वेग आलाय. नाशिक जिल्ह्यातही (Nashik) भाताची लावणी जोरात सुरूंय. भातासाठी युरिया खताची (Urea Fertilizer) आवश्यकता मात्र त्र्यंबकेश्वर सुरगाणा पेठ भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या (Tribal Farmers) खिशावर डल्ला मारला जातोय. झी 24 तासनं इन्व्हेस्टीगेशन केल्यानंतर याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरियाच्या एका गोणीचा भाव 266 रूपये असताना हीच गोण 280 ते 300 रूपयांना विकली जातेय. इतकच नाही तर दुसऱ्या कंपनीच्या खताची 1200 रूपयांची गोण घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही अशी नाकाबंदी खत विक्रेत्यांकडून केली जातेय. या दुहेरी लुटीनं शेतकरी पुरता बेजार झालाय.  पावसाची अनिश्चितता, वाढलेली मजुरी, घटलेलं क्षेत्रफळ अशा विविध संकटांचा सामना करत हे शेतकरी मोठ्या कष्ट्यानं भात पिकवतात. त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. जिल्हा बँका आधीच संकटात असल्यानं सावकारांकडून किंवा दुकानदाराकडून कर्ज घ्यावं लागतं. तिथं आता खतं विक्रेत्यांकडून सुरू असलेल्या लुटीला तोंड द्यावं लागतंय. तर कृषी अधिकाऱ्यांनी खत माफियांवर कारवाई करण्याऐवजी पक्क्या बिलांवर खतांची खरेदी करा असा सल्ला शेतकऱ्यांना दिलाय. 


शेतकऱ्यांना मदत देताना कुठलाही गैरव्यवहार होऊ नये यासाठी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी आणि गुण नियंत्रण विभाग असे तीन तीन विभाग कार्यरत आहेत. मात्र शेतकऱ्यांना लुटणा-या माफियांवर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे या लुटीला सरकारी बाबूंचा आशीर्वाद तर नाही ना? असा संशय निर्माण झालाय. त्यामुळे खत माफियांवर कडक कारवाई करून  शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची गरज आहे. 


बोगस बियाणं कसं ओळखावं? 
दुसरीकडे बोगस बियाणांनीही शेतकरी त्रस्त झालाय. बियाण्यांच्या पाकिटावर कंपनीच्या नावाचा चमकणारा लोगो असतो. मात्र बोगस बियाण्याच्या पाकिटावरील छपाईत शाब्दिक फेरफार केला जातो. कंपनीच्या नावाशी मिळतंजुळतं नाव बोगस पाकिटावर असतं. बोगस बियाण्यांच्या पाकिटावर बॅच नंबर नसतो किंवा पुसट असतो. बोगस बियाण्यांच्या पाकिटाचं पॅकिंग व्यवस्थित नसतं. अनधिकृत विक्रेत बियाणे विक्रीच्या पावत्या देत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनो, पाऊस पडल्यानंतर पेरणीची घाई करू नका. तुम्ही जे बियाणं पेरताय, ते अधिकृत आहे, याची खातरजमा करून घ्या. नाहीतर तुमचा पैसा आणि मेहनत दोन्ही वाया जाईल आणि तुमचं मोठं नुकसान होईल.