सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : मित्रासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच धक्कादायक निर्णय घेतला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेलरोडवरील मोरे मळ्यातील पिंपळपट्टी रोड भागात राहणाऱ्या मित्राच्या घराला त्याने आग लावली. यावेळी घरात मित्राची आई, दोन बहिणी आणि एक भाऊ होते.  आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे कुटुंब वाचलं. या प्रकरणी मित्राच्या आईने फिर्याद दिली असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण
नाशिक जिल्ह्यातील जेलरोडवरील मोरे मळ्यातील पिंपळपट्टी रोड भागात निखिल आणि प्रथमेश हे दोन तरुण राहतात. काही कारणामुळे या दोघांमध्ये भांडण झालं होतं. प्रथमेशच्या आईने निखीलविरोधात पोलिसात गुन्हा दाखत केला. याचा राग निखिलच्या मनात होता. या रागातून शुक्रवारी रात्रीच्या वेळी निखिल प्रथमेशच्या घरी गेला. प्रथमेश काही कामानिमित्त मुंबईला (Mumbai) गेला होता. घरात प्रथमेशची आई, त्याच्या दोन बहिणी आणि एक भाऊ असे चारजण होते. हे चौघंही गाढ झोपेत होते. 


रागाच्या भरात निखिलने घराच्या दरवाजाची कडी बाहेरून बंद केली. आणि घरच्या बेडरूमच्या खिडकीतून घरातील साहित्यावर पेट्रोल टाकून आग लावली. काही वेळात घरात धूर निघू लागला. या धुराचा वास आल्याने झोपलेल्या कल्याणी मोरे आणि त्यांच्या मुलांना जाग आली. घरात कसला वास येतोय हे बघता तर घरातील पडदे, चादरी आणि दरवाजाला आग लागलेली असल्याचे त्यांना दिसलं. आगी पासून वाचण्यासाठी त्यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला.. मात्र दरवाजा बाहेरून बंद होता. धुरामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. घराबाहेर उभ्या असलेल्या निखिलने तुम्हाला आज संपवूनच टाकतो, अशी धमकी दिली. कल्याणी मोरे यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिक येत असल्याचे पाहून संशयित निखिलने पळ काढला.   


या कारणासाठी जाळलं घर
संशयित निखिल बोराडे आणि प्रथमेश मोरे हे मित्र आहेत. दोघेही नाशिकरोड येथील मोरे मळा परिसरात वास्तव्यास आहेत. या दोघामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. यानंतर निखिल याने त्याच्या साथीदारांसह प्रथमेश मोरे याच्या घरात जाऊन साहित्याची तोडफोड केली होती. यामुळे प्रथमेशची आई  कल्याणी मोरे यांनी निखिल विरोधात फिर्याद दिल्याने निखिलच्या मनात राग होता.


हा राग मनात धरुन निखिलने प्रथमेशचं संपूर्ण कुटुंब संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.