नाशिककरांनो हे पाणी वाचवा...जल है तो कल है...
जिल्ह्यात केवळ दहा टक्के पाणीसाठा उरला असला, तरी नाशिक शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाताना दिसते.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : जिल्ह्यात केवळ दहा टक्के पाणीसाठा उरला असला, तरी नाशिक शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाताना दिसते. नागरीकच नाही तर खुद्द महापालिकाही पाणी वाया घालवताना दिसत आहे. अंबड परिसरात पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहत असल्याचं दिसल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
पाण्याची टाकी आहे नाशिक शहरातील अंबड परिसरातील. प्रभाग क्रमांक 28 च्या परिसरात महापालिकेच्या पाण्याच्या टाकीत उंच पाणी भरून ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे . हे एकदा नव्हे तर अनेकदा झाल्याचे चित्र स्थानिक नागरिक सांगतात.
एका बाजूला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला पाण्यासाठी पायपीट करताना दिसतात, तर अनेक ठिकाणी जीव धोक्यात घालून हंडाभर पाणी पिण्यासाठी आणतात . असे असताना पालिकेने आता पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
दुष्काळाच्या आढावा बैठकीत नाशिक पाटबंधारे विभागाने ही पालिका पाणी मोठ्या प्रमाणात वापरत असल्याची तक्रार पालक सचिवांकडे केली होती. पालक सचिव यांनी याची दखल घेत महापालिकेला पाणी पुरवठ्याचा नियंत्रित वापर करण्याविषयी सूचना केली होती. याबाबत फेर विचार करण्याचं सांगत महापालिकेने उचित काळजी घेण्याचे आवाहनही केलं होतं.
30 जुलै पर्यंत पाणीसाठा पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या गंगापूर धरणाच्या समूहामध्ये आहे अतिरिक्त मुख्य धरण असलं तरीही पाऊस उशिरा येईल अशी शक्यता लक्षात घेत पाण्याचा काटकसरीने वापर प्रत्येकाने करण्याची गरज आहे.