नाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?
रामकुंडावरील गोमुखातून येणारं अरुणा नदीचं पाणी गेल्या अनेक वर्षांपासून आटलंय आणि माहिती भाविकांना दिलीच जात नाहीस, गोदावरी स्वच्छता अभियानात चक्क 12 ट्रक अस्थींचा गाळ
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकचं रामकुंड (Nashik, Ramkunda) म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र या गोदावरी नदीत (Godavari River) असलेल्या रामकुंड परिसरात श्रद्धेचा बाजार सुरू असल्याच समोर आल आहे. गोदावरीत अस्थी विसर्जन केलं की मृतात्म्याला थेट मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धाळूंची भावना आहे. अरुणा, वरुणा आणि गोदावरी या तीन नद्यांचा संगम होत असल्यानं इथंच अस्थी विसर्जन केलं जातं. त्रिवेणी संगमाच्या नावावर इथं धार्मिक विधी केले जातात. मात्र रामकुंडावरील गोमुखातून येणारं अरुणा नदीचं पाणी गेल्या अनेक वर्षांपासून आटलंय, याची माहिती भाविकांना (Devotees) दिलीच जात नाही.
12 ट्रक अस्थींचा खच
दुसरीकडं रामकुंडातील पाण्याचा प्रवाह थांबल्यानं तसंच परिसरात झालेल्या काँक्रिटीकरणामुळं अस्थींचं रासायनिक विघटन होणं थांबलंय.. त्यातून अस्थींचे ढीग वाढतच आहेत. नाशिक महापालिकेनं सुरू केलेल्या गोदावरी स्वच्छता अभियानात चक्क 12 ट्रक अस्थींचा गाळ बाहेर काढण्यात आला. दरम्यान, अस्थी विसर्जन हा आस्थेचा मुद्दा असल्यानं यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी लवकरच महंतांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं.
भाविकांच्या श्रद्धेशी खेळ
रामकुंड परिसरात अस्थीविलय कुंड आहे. याठिकाणी अस्थी विसर्जन केल्याने त्याचं पाणी होतें आणि हुताम्यांना मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे संपूर्ण भारतातून अस्थी विसर्जनासाठी नागरीक याठिकाणी येत असतात. या अस्थिविलय कुंडात महापुरुष, नेते, कलाकार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले आहे. मात्र कुंडाची स्वच्छता करत असताना संपूर्ण रामकुंडातून चक्क अस्थींचा 12 ट्रक गाळ आढळल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.
रामकुंड पवित्र स्थान
नाशिक शहराच्या मध्यस्थानी असलेले रामकुंड हे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांचा वास असल्याच म्हटलं जातं. प्रभू रामचंद्र यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता. त्यादरम्यान प्रभू रामचंद्र हे नाशिक इथं आले होते. आणि याच रामकुंडात प्रभू रामचंद्र स्नान करत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या कुंडात स्नान केल्याने मनुष्यास पापमुक्ती मिळते असं मानलं जातं. तसंच बारा वर्षांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड इथं कुंभमेळा भरतो. समुन्द्रमंथनाच्या वेळी अमृत कलशातून काही थेंब रामकुंडात पडले आणि रामकुंड पवित्र झाला अशी अख्यायिका आहे. यामुळे याठिकाणी साधू महंत कुंभमेळ्यात शाही स्नानाकरिता येत असतात.
नाशिकच्या रामकुंडावर अस्थी विसर्जनासाठी देशभरातून भाविक येतात. अस्थींचा हा खच पाहून त्यांच्या भावना निश्चितच दुखावल्या जात असतील श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला भक्तीचा हा बाजार बंद व्हायलाच हवा आणि गोदावरीचं होणारं प्रदूषण देखील थांबायला हवं.