सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक  : नाशिक-मुंबई महामार्गावर ठाकरे गटाच्यावतीने  (Shivsena Thackeray Group) मंगळवारी म्हणजे 23 जूनला सकाळी आंदोलन करण्यात आलं. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ ठाकरे गटानं आंदोलन केलं. यावेळी  ठाकरे गटाने घोटी टोल नाका बंद (Ghoti Toll Naka) पाडला होता. तब्बल दीड तास ठाकरे गटानं टोल नाक्यावर आंदोलन केलं. यामुळे टोलनाक्यावर जवळपास दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाला आश्वासन देण्यात आल्यानंतर ठाकरे गटानं आंदोलन स्थगित केलं. आश्वासन दिल्याप्रमाणे 15 दिवसांत महामार्गावरील खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
नाशिक मुंबई महामार्गावर ठाकरे गटानेचा वतीने इगतपुरी इथल्या घोटी टोल नाक्यावरती आंदोलन केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय. नाशिक मुंबई महामार्गावर  (Nashik-Mumbai Highway) पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी शेकडो कार्यकर्ते टोल नाक्यावर उपस्थित होते आणि यावेळी टोल बंद करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत होती. ग्रामीण पोलिसांनी जमावबंदीचा उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे अशा तब्बल 24 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तर 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची यात नावं आहेत.


मृत महिला कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी एक मोठा प्रताप केला. चक्क मृत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला. ठाकरे गटाच्या 200 पेक्षा अधिका कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करताना पोलिसांनी मृत शोभाताई मगर यांच्या नावाचाही समावेश केला. शोभाताई मगर यांचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. शोभाताई मगर हे नाशिकमधलं मोठं नाव आहे. त्या आधी ठाकरे गटात होत्या. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्याकडे नाशिकच्या महिला गटाचं कामही देण्यात आलं होतं. पण अंतर्गत वादामुळे त्यांची पदावरुन आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काही काळानंतर त्यांना पुन्हा शिंदे गटात प्रवेश देण्यात आला होता.