ठाकरे गटाचं शक्तीप्रदर्शन पण येवल्यात शिंदे गटाकडून जोरदार धक्का
शिवसेनेत फूट, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्यात गटबाजी
मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजून मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. तर दुसरीकडे शिवसेनेनं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते, आमदार फुटत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी नियोजन केलं आहे.
नाशिकचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. नगरसेवक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. आम्ही पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी नगरसेवक भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कट्टर शिवसैनिक म्हटले जाणा-यांनी निष्ठावंतांनी स्वतंत्र गट स्थापन करत शिवसेनेच्या बुरुजांना तोफा लावल्याने किल्ल्याच्या डागडुजीसाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील सर्व आजी माजी नगरसेवकांची एकनिष्ठतेची शिकवणी ते स्वतः आज मातोश्रीवर घेत आहेत. विशेष म्हणजे शिवबंधन बांधण्याची परंपरा मोडीत काढत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणारे.
नाशिक जिल्ह्यातील कोर कमिटीतील पदाधिकारी या सर्व नगरसेवकांना घेऊन आज 11 ते 12 च्या दरम्यान मातोश्रीवर दाखल होत आहेत.
दुसरीकडे नाशिकच्या येवल्यात युवासेनेत खिंडार पडलं आहे. येवल्याचे युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त शिंदे गटात सामील झाले आहेत. आज शिंदेंना भेटण्यासाठी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.