Students journey through flood waters : महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाने कहर (Flood) केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लहान मुले पुराचे पाणी ओलांडून जीव धोक्यात घालून शाळेत जात आहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाशिकमधील (Nashik) आहे. भेगू सावरपाडा या आदिवासीबहुल भागात मुलांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांतील मुलांना दररोज अशाच पद्घधतीने शाळेमध्ये जावे लागते. या मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून आजतागायत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. या मार्गावर पूल बांधण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी चक्क बंधाऱ्यावरून प्रवास करावा लागत आहे (Students journey through flood waters). या बंधाऱ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहताना दिसत असून विद्यार्थी आणि पालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.


कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी आदी गावातील विद्यार्थ्यांना दररोज अशाच प्रकारे पूराचे पाणी वाहत जाणाऱ्या बंधाऱ्यावरुन प्रवास करावा लागत आहे. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले असून विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे कोणताही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी पालकांसह, ग्रामस्थांनी केली आहे.


 



दरम्यान, मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात परिस्थिती बिकट आहे. पावसामुळे बिघडलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एकूण 14 एनडीआरएफ पथके आणि 6 एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात पावसामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पाऊस अव्याहत सुरूच आहे. या पावसाचा जनावरांवरही मोठा परिणाम झाला आहे. पावसामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे 200 जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, कोल्हापूर, अकोला, नागपूर येथे पावसामुळे परिस्थिती अधिक धोकादायक आहे. राज्यातील 249 हून अधिक गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.