सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक : मंदिरांची नगरी असलेल्या नाशकात सध्या पूजाविधीवरून भलताच वाद रंगला आहे. एकमेकांचे यजमान पळवण्यावरून पुरोहितांच्या दोन गटांमध्ये सोमवारी चक्क जोरदार राडा झाला. नाशकात श्रद्धेचा बाजार कसा सुरू आहे याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी दुपारी गोदावरीच्या काठावर पुरोहितांमध्ये तुफान राडा झाला. रामकुंडासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रावर सुरू असलेली ही वादावादी झाली आणि वाद कशावरून? तर यजमान पळवण्यावरून हा वाद पेटला. 


पराग कोठारी नावाचे नाशिकचे गृहस्थ वर्षश्राद्धासाठी रामकुंडावर आले होते. नितीन पाराशरे हे पुरोहित वर्षश्राद्धाची पूजा करत असताना पुरोहितांचा दुसरा गट तिथं आला आणि धक्काबुक्की सुरू झाली.



पुरोहितांमधील हा वाद काही आजचा नाही. यापूर्वी देखील त्र्यंबकेश्वर मंदिरात अशाप्रकारचा वाद झाला होता. रामकुंडावर झालेल्या या वादावादीमुळं पुरोहितांची चांगलीच शोभा झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीमध्ये देखील पुरोहितांमधले वाद असेच विकोपाला गेले होते. 


या वादाची चौकशी करताना काही पुरोहितांकडे चक्क गावठी कट्टे आढळले होते. अशा घटनांमुळं नाशिकची प्रतिमा मलीन होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. 


पुरोहित संघानं या सगळ्या वादावर स्पष्टीकरण देणं टाळलं आहे. पण यामुळं मंदिर नगरी असलेल्या नाशिकच्या धार्मिक महत्त्वाला गालबोट लागत आहे. धार्मिक कार्य करणा-या पुरोहितांनी गावगुंडांसारखी अशी हाणामारी करणं निश्चितच भूषणावह नाही हे नक्की.