नाशिक : जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (३३) हे शहीद झाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी लखनऊच्या विजेता, दोन वर्षांची मुलगी, बॅंकेतून निवृत्त झालेले वडील अनिल, आई सुषमा, जर्मनीतील धाकटा बंधू असा परिवार आहे. शहरातील डीजीपीनगर -१  एक मधील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटीमधील बॅंक ऑफ इंडिया कॉलनीतील बारा क्रमांकाच्या बंगल्यात मांडवगणे कुटुंबीय राहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निनाद यांचा जन्म १९८६ मध्ये झाला असून त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण भोसला मिलीटरी स्कूलमध्ये झाले. अकरावी, बारावीचे शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या सैनिकी पूर्व संस्थेतून पूर्ण केले. ते २६ व्या अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी होत. त्यांनी बी. ई. मॅकेनिकल ही पदवी घेतली असून त्यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीमध्ये झाली. हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यावर २४ डिसेंबर२००९ मध्ये भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले. २४ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांची निवड स्कॉड्रन लिडरपदी झाली. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक होती. 


आई- वडील लखनऊमध्ये निनाद यांच्या आई बॅंक ऑफ इंडियामधून, तर वडील सिंडीकेट बॅंकेतून निवृत्त झाले आहेत. कौटुंबिक कारणास्तव ते लखनऊला गेले आहेत. उद्या रात्री ते परत नाशिकला येणार आहेत. भारतमातेच्या प्रेमाने भारावून गेलेली कुटुंबातील सदस्य सोडून गेल्याने मांडवगणे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.