मुकुल कुलकर्णी, प्रतिनिधी, झी मीडिया, नाशिक : नाशिकची क्राईम कॅपिटल व्हायला लागल्याची उदाहरण वारंवार समोर येतच होती. पण आता नाशिकमध्ये मुलींची तस्करीही होत असल्याचं उघड झालंय. बांगलादेशातून तरूणींना फूस लावून भारतात आणलं जात असल्याचा आरोप एका बांगलादेशी तरूणीने केलाय. त्यानंतर ही बाब उघड झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वतःच्याच मावशीने या तरूणीला भारतात फिरण्याच्या बहाण्याने एका दलालाला विकलं. बांगलादेशातून चोरट्या मार्गाने तिला कोलकाता आणि तिथून नाशिकमध्ये आणलं गेलं. सुरूवातीला तिच्यासोबत १५ ते २० मुली होत्या. त्यांचं बनावट मतदार ओळखपत्र, इतर पुराव्याचे दाखले बनवण्यात आले.


नाशिकजवळ सिन्नरच्या कुंटणखान्यात ही मुलगी पोहोचली. त्यानंतर तिला मुंबईला चार लाखांना विकण्यात आलं. तिथे तिच्यावर अमानूश अत्याचार झाला. त्यानंतर नाशिकमधल्या एका ओळखीच्या तरूणाच्या मदतीने तिने पळ काढला. दरम्यानच्या काळात या दोघांनी लग्न केलंय. मात्र आता सिन्नरमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेचे गुंड आणि मुंबईतले गुंड यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं ती तरूणी सांगते. ग्रामीण पोलीसही त्यांच्या तक्रारीकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.


या दोघांच्या तक्रारीनंतर अखेर पोलिसांनी तिघांना अटक केलीय. बांगलादेशातून मुलींची तस्करी करून वेश्या व्यवसायात ढकलल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तरूणीने याआधी सिन्नर पोलिसांशी संपर्क साधला होता. मात्र पोलिसांनी तिला पुन्हा कुंटणखान्यात जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप तरूणीने केलाय. त्यामुळे या प्रकरणात सिन्नर पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटत असल्याने त्यांचीही चौकशी सुरू झालीय. या प्रकरणात मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.


पोलिसांनी छापे टाकून सिन्नर एमआयडीसीत कुंटणखाना चालवणारी मंगल गंगावणे, तिचा मुलगा विशाल गंगावणे, दलाल सोनू देशमुख या तिघांना अटक केलीय. नाशिकमध्ये सातत्याने खून, मारामाऱ्या, दरोडे यांचं सत्र सुरूच आहे. आता कुंटणखाना, वेश्या व्यवसाय, मुलींची तस्करी उघड झाल्यामुळे पोलिसांची अक्षरशः झोप उडालीय. यात सिन्नरच्या पोलिसांनी मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं चौकशीत उघड झालं तर तो नाशिक ग्रामीण पोलिसांसाठी एक मोठा कलंक असेल.