नाथाभाऊ आणि सुरेशदादा भजी महोत्सवात एकत्र
जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते भजी महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले. या दोन्ही नेते जिल्ह्यासाठी एकेकाळी राजकारणातील धुरंधर मानले गेले.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते भजी महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले. या दोन्ही नेते जिल्ह्यासाठी एकेकाळी राजकारणातील धुरंधर मानले गेले. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक बाबतीत साम्य म्हणावं लागेल. सुरेशदादा आणि नाथाभाऊंनी राजकारणात अनेकांना मोठं केलं, अनेकांनाच नाही, ज्या पक्षात होते त्या पक्षाला बळ देण्याचंही मोठं काम केलं.
नाथाभाऊ आणि सुरेशदादांच्या नशिबात राजकारणात जेवढे चांगले दिवस आले, तेवढे वाईट अनुभव देखील आले. सत्ता सर्वकाही असतं, सत्तेची नशा काय असते, आणि ती उतरते त्यानंतर आपण व्यक्ती म्हणून काय असतो, हे अनुभव महत्वाचे आणि राजकारणात दुर्मिळ मानले जाणारे अनुभव देखील या नेत्यांकडे आता आहेत.
नाथाभाऊ आणि सुरेशदादा यापूर्वीचे राजकीय विरोधक, पण आता परिस्थितीने दोन्ही नेत्यांमधील दरी संपण्याची वेळ आली असावी, शहरात भजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा सुरेशदादा आणि नाथाभाऊंची एकाच टेबलावर बैठक बसली, नाथाभाऊंनीही सुरेशदादांना मिरचीची भजी देऊन, गोडवा निर्माण करण्याची सुरूवात केली.
नाथाभाऊंचा मंत्रिपदी कमबॅक होण्याची चिन्हं आहेत, अशावेळी सुरेशदादांसारख्या नेत्याशी सौख्य असल्यावर नाथाभाऊंना जिल्ह्यात अडचण तर येणारच नाही, पण नाथाभाऊंच्या राजकीय शत्रूंना कोणतीही छुपी चाल चालता येणार नाही, हे देखील उघड आहे.