बदलापूर : बदलापूर - वांगणी स्टेशनदरम्यान अडकून पडलेल्या 'महालक्ष्मी एक्सप्रेस'मधल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु झालेत. एनडीआरएफ आणि नौदलाच्या मदतीनं आत्तापर्यंत २५० महिला आणि लहान मुलांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी एनडीआरएफच्या मदतीला नौदलाची एक टीमही घटनास्थळी उपस्थित झालीय. सोबतच नौदलाचं एक हेलिकॉप्टरही तैनात आहे. सुरुवातीला महिला आणि लहान मुलांना बोटीच्या साहाय्यानं रेल्वेतून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात येतंय. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि पुरुषांनाही हलवण्यात येईल.


एनडीआरएफ - नौदल मदतीला

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रभर मुसळधार पावसानं रेल्वे प्रवाशांना चांगलाच दणका दिलाय. बदलापूर - वांगणी दरम्यान नदीचे पाणी रेल्वे रुळांवर आल्याने कर्जतकडे जाणारी वाहतूक रात्री उशिरापासून ठप्प आहे. बदलापूरजवळ 'महालक्ष्मी एक्सप्रेस' रात्री उशिरा १०.०० वाजल्यापासून या जागेवर अडकून पडली आहे. या रेल्वेत जवळपास २००० प्रवासी असल्याचं समजतंय. दरम्यान, पावसाचा जोर कायम असताना रेल्वेमध्ये पाणी शिरल्याची चिन्हं दिसत असल्यानं प्रवासी धास्तावले आहेत. दरम्यान, आरपीएफ अधिकारी आणि पोलीस नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच मदत दाखल होत असून कुणीही घाबरून जाऊ नये, हे त्यांनी गाडीतील प्रवाशांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलाय. 



रेल्वे सुरक्षा दल आणि पोलीसही 'एनडीआरएफ'टीमच्या मदतीसाठी अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या मदतीसाठी दाखल झाले आहेत. धास्तावलेल्या नागरिकांना दिलासा देत त्यांनी प्रवाशांसाठी बिस्कीट आणि पाण्याची सोय केलीय.


 


प्रवाशांच्या मदतीसाठी पोलीस, रेल्वे सुरक्षा दल दाखल

मध्ये रेल्वेनं महालक्ष्मी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक ट्विट केलंय. 'रेल्वे ही सुरक्षित जागा आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी खाली पाण्यात उतरु नये. रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल, शहर पोलीस रेल्वेत दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या सूचना पाळा' असं आवाहन या ट्विटद्वारे करण्यात आलंय.



बदलापूर - वांगणी स्टेशनदरम्यान कासगावाजवळ ही एक्सप्रेस अडकलीय. परिसरात चार-पाच फूट पाणी साचलंय. या प्रवाशांच्या मदतीला सकाळी ८.०० वाजल्याच्या सुमारास 'एनडीआरएफ'ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. प्रवाशांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्याची योजना एनडीआरएफच्या टीमनं आखलीय. परंतु, यासाठी पाऊस थांबून हवामान स्वच्छ होण्याची आवश्यकता आहे.


महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकल्यानं आजची तिरुपतीला जाणारी ही रेल्वे रद्द करण्यात आलीय. मुंबईवरून येणारी महालक्ष्मी ट्रेन तिरुपतीला जाते. ही रेल्वे सकाळी ११.०० वाजल्याच्या सुमारास कोल्हापुरात पोहचणं अपेक्षित होतं.


महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकले प्रवासी

 


बदलापूरमध्ये रात्रभर सुरू असणारा मुसळधार पाऊस अजूनही बरसतोय. बदलापूरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलाय. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. उल्हास नदीनंही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.