Navi Mumbai Crime : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच नवी मुंबईत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  नवी मुंबईत पोलिस हेड कॉन्स्टेबलची हत्या करुन धावत्या लोकल समोर फेकण्यात आले आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. महाराष्ट्रात चाललंय काय? असा प्रश्न उपस्तित केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय चव्हाण असे हत्या झालेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड  कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. विजय चव्हाण यांची  गळा दाबून हत्या करत त्यांना रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोघा मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. 


मृत विजय चव्हाण हे घणसोली येथे राहण्यास होते. तर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. बुधवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास दोघा व्यक्तींनी हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहुन वाशीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिले होते. याबाबतची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 


यावेळी सदर घटनेतील मृत व्यक्ती हे पवनेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचे उघडकीस आले. शवविच्छेदन अहवालात विजय चव्हाण यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आढळून आले असून मारेकऱयांनी त्यांचा अपघातात मृत्यू झालाय असे भासवण्यासाठी त्यांना धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याची प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी दोघा अज्ञात मारेकऱया विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत.