अटल सेतूवर थरार; महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, कॅब ड्रायव्हरनं केस धरले आणि... आता म्हणते, `देवांचे फोटो...`
Atal Setu News Today: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू सी लिंकवर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे संबंधित महिला आत्महत्या करत होती. मात्र, टॅक्सी चालकाने प्रसंगावधान राखत तिचे प्राण बचावले. सीसीटिव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
Atal Setu News Today: अटल सेतूवर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मुबंईवरून नवी मुंबईकडे येणाऱ्या लेनवर गाडीतून उतरून देवाचे फोटो विसर्जित करण्याच्या बहाण्याने ब्रीजच्या रेलिंग वरून 56 वर्षाच्या रीमा पटेल या गृहिणीने आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला परंतु गाडी चालक आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गृहिणीला वाचवण्यात यश आले आहे. याआधी अटल सेतू वरून दोन जणांनी उडी मारून आत्महत्या केली आहे.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर एक महिला आत्महत्या करत होती. परंतु त्याचवेळी न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलिस तिथे आले आणि त्यांनी तिचा जीव वाचवला. पण, मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले असल्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.
शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी ७ च्या दरम्यान मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली. तिने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने प्रसांगवधान राखत महिलेला धरून ठेवले. याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांनी तिला बाहेर काढले.
संबंधित महिला आधी ऐरोली पुलावर गेली होती. परंतु, तिच्या अध्यात्मिक गुरुंनी खोल समुद्रात हे देवांचे फोटो फेकायला सांगितले. त्यामुळे ती अटल सेतूवर आली. अटल सेतूवर पोहोचल्यानंतर ती एक एक फोटो समुद्रात टाकत होती. तेवढ्यात तिला वाहतूक पोलिसांच्या जीपचा आवाज आला आणि तिचा तोल गेला. त्यामुळे ती पडली. याच काळात कॅब चालकाला संशय आल्याने ती फोटो टाकत असताना तो रेलिंगच्या अलीकडेच उभा होता. जेव्हा ती खाली पडली तेव्हा कॅबचालकाने तिच्या केसांनी तिला पकडून ठेवले. तेवढ्यात वाहतूक पोलीस आले आणि तिची सुटका केली, अशी माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
व्हिडिओत काय?
अटल सेतूवर येऊन गाडी थांबली असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याचवेळी नाव्हा - शेवा पोलिसांची पेट्रोलिंग करणारी पोलीस व्हॅन तेथे पोहचली. यावेळी ही महिला देवाचे फोटो घेऊन समुद्रात फेकत होती. पोलीसांना बघताच तिने उडी मारण्याचा प्रयत्न केला यावेळी कॅबचे ड्रॅयव्हर संजय यादव यांनी उडी मारणाऱ्या महिलेचे केस पकडले त्यानंतर वाहतूक पोलिसांनी या आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचवले आहे.