मुंबई: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा  यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी प्रसार माध्यमांना हनुमान चालिसा दाखवली. बाहेर येताच त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. "हनुमान चालिसा वाचल्यामुळे जर मला 14 दिवस काय मला 14 वर्षांची जरी जेल झाली तरी मी भोगायला तयार आहे" त्या पुढे असं देखील म्हणाल्या, "मी उद्धव ठाकरे यांना चॅलेंज देते की, त्यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही मतदारसंघातून दम असेल तर जनतेतून निवडून यावे, मी त्यांच्याविरोधात उभी राहील"


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत राणा पुढे असं सुद्धा म्हणाल्या, येणाऱ्या निवडणुकीत मी पूर्ण क्षमतेने जनतेत जाणार. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांना दाखवून देईल की, हनुमान आणि प्रभू श्री रामाचं नाव घेणाऱ्यांना त्रास दिल्याचा काय परिणाम होतो.  नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, मी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत आहे. पण जो अन्याय माझ्यावर झालाय त्याच्याविरोधात मी आवाज उठवत राहणार. 

 


नवनीत राणा यांचे रुग्णालयाबाहेर स्वागत



नवनीत राणा रुग्णालयाबाहेर येताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आलं. त्यांना कार्यकर्त्यांकडून भगवी शाल देण्यात आली. तसंच हनुमानाची एक मूर्ती देण्यात आली. नवनीत राणा यांच्या स्वागता दरम्यान कार्यकर्त्यांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यात आल्या. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांकडून शंखनाद देखील करण्यात आला.