नाशिक : साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आजपासून सुरु  होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. नवत्रोत्सव काळात सप्तश्रृंगी गडावर नऊ दिवस मोठी यात्रा भरते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नुकतीच जिल्हा प्रशासनाने गडावर आढावा बैठक घेत नवरात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. मंदिर ट्रस्टने नवत्रोत्सवाच्या धर्तीवर रंगरंगोटी तसेच साफसफाईची कामे पूर्ण केलीत. तसेच मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने गाड उजळून निघालाय. 


गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. त्याप्रमाणे नवत्रोत्सव काळात २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांना ट्रस्टतर्फे मोफत भोजन आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. तर स्थानिक ग्रामपंचायतीने भाविकांसाठी पिण्याची पाणी तसेच शौचालयाची व्यवस्था केलीये.


नवरात्रोत्सव काळात घाटात अपघात होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. नवत्रोत्सव काळात राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व्यतिरिक्त  कुठल्याही खासगी वाहनांना गडावर प्रवेश देण्यात येणार नाही. सुमारे २१५ बसेस नांदूरी ते गडावर चालविण्यात येणार आहेत त्यासाठी दोन्ही ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहे. गडावर ३ ते ४  ठिकाणी  अपघात प्रवण क्षेत्र असून, रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून पुरेशा लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनही यात्रेसाठी सज्ज झालं असून यात्रेसाठी खास बंदोबस्त तैनात केलाय..