...म्हणून मागील 18 वर्षांपासून श्रीरामपूरमधील मुस्लीम दांपत्य करतं दुर्गा मातेची आराधना
Navratri Utsav 2023 : अहमदनगरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाकडून गेल्या 18 वर्षांपासून देवीची आराधना केली जात आहे. विरोधानंतरही मोठ्या भक्तीभावाने हे कुटुंब नवरात्रोत्सवात देवीची स्थापना करत आहे.
कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव (Navratri Utsav 2023) साजरा केला जात आहे. भक्तांकडून मोठ्या उत्साहात देवीची आराधना केली जात आहे. पण असेही काही भाविक आहेत जे धर्माच्या भिंती ओलांडून देवीची भक्ती करताना दिसत आहे. अहमदनगरमध्येही (Ahmednagar) असेच एक मुस्लिम कुटुंब आहे जे नवरात्रोत्सवात देवीची मनोभावे पूजा करत आहे. गेल्या 18 वर्षांपासून हे कुटुंब देवीची भक्ती करत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या श्रीरामपूर येथील एक मुस्लिम कुटुंब देवीवर असलेल्या श्रद्धेतून आपल्या धर्माबरोबरच गेल्या 18 वर्षांपासून नवरात्र उत्सवात देवीची मनोभावे आराधना करत आहेत. गोंधवणी रोड येथे आपल्या कुटुंबा समवेत वास्तव्यास असलेल्या मुमताज शब्बीर शहा यांचे 2005 साली आरोग्य बिघडले होते.अनेक उपाचार घेऊनही त्यांना काहीच फरक पडत नव्हता. यादरम्यान शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबियांसमवेत त्यांनी देवीची आराधना केली आणि मुमताज यांना आपल्या प्रकृतीत बदल जाणवायला लागला.
अनेकांनी देवीची आराधना सुरू करण्याचा सल्ला दिला. दुविधा मनस्थितीत मुमताज यांनी श्रद्धेला महत्त्व दिले आणि वेळप्रसंगी आपल्या धर्माकडील विरोधही पत्करून आपल्या अल्लासह देवीच्या रूपात परमेश्वर बघत मुमताज यांनी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करून 18 वर्षांपूर्वी आदिशक्तीची उपासना सुरू केली. दरवर्षी नवरात्रीत मुमताज घटस्थापना करुन नऊ दिवसांच्या उपवासासह हिंदू परंपरेप्रमाणे मनोभावे सर्व पूजाअर्चा देखील करतात. पत्नीच्या या श्रध्देला त्यांचे पती शब्बीर शहा यांनी मोलाची साथ दिली आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. समाजातील दूषित वातावरणातही या मुस्लिम कुटुंबाची देवीवर असलेल्या श्रद्धेतून, धर्मद्वेषाची निर्माण झालेली दरी यानिमित्ताने कमी व्हावी अशी अपेक्षा ते व्यक्त केली जात आहे.
"2005 मध्ये मला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होत होता. त्याच्यामधून मा लवकर निघता आलं नाही. बरेच प्रयत्न केले. डॉक्टरांनी कर्करोगाचा आजार सांगितला. डॉक्टरांनी मला तीनच महिन्यांची मुदत दिली होती. तीन महिने तुम्ही जीवंत राहू शकता असे शिर्डीच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यानंर पतीचा दुसरा विवाह लावून दिला. मात्र तिसुद्धा माझ्या घरात टिकली नाही. त्यावेळी पतीला मला वेड्यांच्या इस्पितळात घेऊन जावं असं वाटलं. पण काही लोकं येऊन बोलली की तुमच्या देवांचा काहीतरी अनुभव घ्या त्यातून काहीतरी मार्ग मिळेल. म्हणून दोन चार लोक आले आणि त्यांनी देवीची गाणी म्हटंली. त्यावेळी आई अंबाबाई प्रसन्न झाली. 18 वर्षांपासून सातव्या माळेला अंबाबाई माझ्याकडे येते. मी सगळ्यांपेक्षा वेगळा असा नवरात्रोत्सव साजरा करते. माझ्या मनाला वाटतं की अंबाबाई माझ्या घरात बसते. अंबाबाई मला कोणत्याच गोष्टीत थांबू देत नाही," असे देवीभक्त मुमताज शब्बीर शहा यांनी सांगितले.