गडचिरोली: छत्तीसगढच्या दंतेवाडा परिसरातील नक्षलवादी हल्ल्याला २४ तास उलटत नाही तोच बुधवारी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी आणखी एक हल्ला केला. येथील जांभीया गट्टा परिसरातील मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवना यावेळी लक्ष्य करण्यात आले. हे कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत पायी चालत जात असताना हा प्रकार घडला. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी दंतेवाडा परिसरात मंगळवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला. भीमा मंडावी यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. यावेळी स्फोटात भीमा मंडावी यांच्या गाडीसोबत पोलिसांच्या गाडीलाही लक्ष्य करण्यात आले. यामध्ये गाडीतील चार जवान मृत्यूमुखी पडले होते. 


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली होती. मात्र, तरीही नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून ताफ्यातील गाडी उडवली. हा ताफा भाजप आमदार भीमा मंडावी यांचा होता. भीमा मंडावी हे सभा आटोपून येत असताना हा स्फोट झाला. बचेलीमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी कुआकोंडा मार्गावर पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याची कल्पना मंडावी यांना दिली होती. त्यामुळे या भागात जाऊ नये, असे बजावण्यातही आले होते. मात्र, मंडावी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. स्फोट झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी जवळपास अर्धा तास गोळीबार सुरु होता, अशी माहिती नक्षलविरोधी कारवायांचे पोलीस अधिक्षक डी.एम. अवस्थी यांनी दिली.