लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, क्रांती नगर : नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पाटोदा इथल्या शेख तौसिफ या आपल्या सुपुत्राच्या अंत्यदर्शनासाठी पाटोदावासियांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच वाजता तौसिफचे पार्थिव त्यांच्या क्रांती नगर भागातील घरी पोहचले. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पाटोदावासियांनी मोठी गर्दी केली होती. तौसिफला सलामी देत  अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह मित्र, सहकारी यांचे डोळे पाणावले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या वेळी हा नक्षली हल्ला झाला त्याच्या अर्ध्या तास आधी तौसिफने आपल्याला फोनवरून कुरखेडाकडे जात असल्याचे आपल्या भावाला सांगितले होते. माझी सुट्टी असताना ती रद्द करून मी कर्तव्यावर जात आहे हे त्याचे शेवटचे शब्द ठरले हे सांगताना तौसिफचा मोठा भाऊ आसिफचे डोळे पाणावले. तौसिफला पोलीस दलात जाण्यासाठी मोठा भाऊ शेख आसिफने मेहनत घेतली. त्याला व्यायामाची आवड लावली. 


गडचिरोलीत नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्याच्या जखमा भळभळत आहेत. भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. नक्षल्यांनी घडवून आणलेल्या या हिंसाचारामुळे संपूर्ण राज्याला हादरा बसलाय. आज दुपारी या शहिदांना गडचिरोलीत मानवंदना दिली जाणार आहे. पोलिसांनी आज पहाटेच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. जागोजागी पोलीस पथकं तैनात आहेत. पोलिसांकडून रस्त्याचा कोपरा न कोपरा, इंच न इंच तपासले जात आहे.



नक्षल्यांची बॅनरबाजी 


मंगळवारी रात्री नक्षल्यांनी १ मे रोजी जाळपोळ केलेल्या दादापूर गावी लाल रंगाचे बॅनर्स लावलेत. २७ एप्रिल रोजी गुंडूरवाही चकमकीत नक्षली कमांडर रामको नरोटी आणि अन्य एका महिला नक्षलीच्या हत्येचा निषेध केला. सरकारचा सर्वशक्तीनिशी विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसऱ्या एका बॅनरमध्ये या भागात पूल-रस्ते निर्मितीला केला विरोध-सरकार भांडवलदारांचे बाहुले असल्याचा आरोप करण्यात आलंय. तर मोदी-फडणवीस यांचा विरोध करण्याचं आवाहनही याद्वारे करण्यात आले आहे.