Sanjay Raut Controversial Statement: विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असं धक्कादायक वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. राऊत यांच्या 'चोर' शब्दावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Mumbai News) राऊत यांच्या या वक्तव्यावर जोरदार गदारोळ झाला. राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी हक्कभंग सूचना मांडली. संजय राऊतांविरोधात हक्कभंगाच्या कारवाईचा निर्णय 8 मार्च रोजी घेतला जाणार आहे. राहुल कूल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या समितीत ठाकरेंसोबतच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार देखील सदस्य आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभागृहाची भावना ऐकून अध्यक्षांनी हक्कभंगावर 2 दिवसांत सखोल चौकशी करून 8 मार्चला निर्णय देणार असल्याचं म्हटलंय. तर, अटकेचा निर्णय उपमुख्यमंत्री घेतील असं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. त्यानुसार  विधानसभा अध्यक्षांकडून हक्कभंग समिती नेमण्यात आली आहे. 


राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. यात अतुल भातखळकर, नितेश राणे यांच्यासह नितीन राऊत, सुनील केदार तसच एकूण 15 सदस्यांचा  समावेश आहे. या समितीत भाजप आणि मित्रपक्षाचे 10,  राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. 


संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन ठाकरे गट एकाकी पडल्याचे दिसत आहे. राऊतांनी थेट विधीमंडळाला चोरमंडळ संबोधून आपल्या मित्रपक्षांचीही मोठी अडचण केली. मात्र यावेळच्या विधानामुळे त्यांना थेट हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 


संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहीजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करू शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला. शाहनिशा करून कारवाई करावी असं अजित पवार यांनी म्हटले. तर, काँग्रेसनेही राऊतांच्या विधानावर असहमती दर्शवली आहे. संजय राऊतांना तातडीनं अटक करा अशी मागणी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केली.