Chhagan Bhujbal on Sharad Pawar: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारल्यानंतर काका आणि पुतण्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैटक होत असल्याने या संघर्षाला धार आली आहे. अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा दिल्याने पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरु आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपण टाकलेल्या गुगलीवर फडणवीस बाद झाले असा टोला लगावला होता. पण आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावरुन शरद पवारांनाच विचारणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"2019 मध्ये सकाळचा शपथविधी का झाला? त्यामागे कोण होतं? साहेब म्हणतात की मी गुगली टाकली, पण गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का?," अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली आहे. 


"काही नेत्यांनी, आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला हे खरं आहे. पण आज अनेक गोष्टींचा उलगडा होईल. 40 पेक्षा जास्त आमदार आज येथे उपस्थित असून काही वाहतूक कोंडीत अडकले आहेत. काही परदेशात असून, काही आजारी आहे. पण या सर्वांची प्रतिज्ञापत्रांवर सह्या झाल्या आहेत," अशी माहिती भुजबळांनी दिली. 


कायदे आम्हालाही कळतात, त्यामुळे आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काही काम केलेलं नाही. सर्व विचार करुनच पुढे पाऊल टाकलेलं आहे. सकाळी उठलो आणि शपथ घ्यायला गेलो असं झालेलं नाही. कायदे, प्रक्रिया या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे पाऊल उचललं आहे असं छगन भुजबळ म्हणाले. आगामी काळात अजून नियुक्त्या होतील अशी माहितीही त्यांनी दिली.


शरद पवार काय म्हणाले होते?


"माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सदाशिव शिंदे. ते देशातील उत्तम गुगली गोलंदाज होते. मोठमोठ्या लोकांचे त्यांनी विकेट घेतले होते. आणी मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे क्रिकेट खेळत नसलो तरी गुगली कसा आणि कुठे टाकायचा हे माहिती होतं. आता विकेट दिली, तर करायचं काय. विकेट घेतलीच पाहिजे," असा टोला शरद पवारांनी लगावला होता. फडणवीस काहीही म्हणत असले तरी आपली विकेट गेली हे सांगत आहेत का? अशीही विचारणा त्यांनी केली होती. 


देवेंद्र फडणवीसांनी केला होता गौप्यस्फोट


"शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विश्वासात घेऊनच केला. मात्र शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडवरच तीन चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी माघार घेतली. त्यांनी आमचा वापर करून घेतला. शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली. एकाप्रकारे त्यांनी आमचा डबलगेम केला," असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर शरद पवारांनी आपल्या गुगलीवर फडणवीस बाद झाले असं म्हटलं होतं.