Chhagan Bhujbal on Dress Code in Temples: राज्यातील अनेक मंदिरांमध्ये (Temples) गेल्या काही दिवसांपासून ड्रेस कोड (Dress Code) पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. यावरुन मत मतांतर असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर टीका केली आहे. तसं असेल तर मंदिरातील पुजाऱ्यांनीही पूर्ण कपडे घालावेत असं स्पष्ट विधान त्यांनी केलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यांनीही धोतर नेसावं, सदरा घालावा, माळ घालावी म्हणजे ते पुजारी आहेत हे कळेल असा सल्लाच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील (Saptshrungi Gad) मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याच्या हालचाली विश्वस्थांनी सुरू केल्या आहेत. त्यातच छगन भुजबळ यांना याबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की "शाळेला सुट्टी लागल्यावर 8-9 वर्षांचा एखादा मुलगा मंदिरात हाफ पँट घालूनच जाणार ना…म्हणे ती हाफ पँट आहे. त्याला बाहेर काढणं हा तर मूर्खपणा आहे".  


"वाटेल तसे कपडे घालू नये, नीटनेटके कपडे घालावे हे मी समजू शकतो. सर्वांनीच जर नीटनेटके कपडे घालायचे असतील तर आतमध्ये जे उघडेबंब असतात ना पुजारी वैगेरे त्यांनी सुद्धा अंगात सदरा बिदरा घालावा. गळ्यात माळ घातल्यावर हा पुजारी आहे कळेल. ते सुद्धा अर्धनग्न नसतात का?," अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यांनीही धोतर नेसावं, सदरा घालावा, माळ घालावी म्हणजे ते पुजारी आहेत हे कळेल असा सल्ला त्यांनी दिला. 


छगन भुजबळ यांनी यावेळी नवीन संसद भवनाच्या (Parliament House) उद्घाटन सोहळ्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढव्यये होते. आता मात्र उघडबंब माणसं होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. शरद पवारांनी आपण धर्मकांडमध्ये सहभागी झालो नाही म्हटलं ते खरंच आहे. देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे?. असा सोहळा राम मंदिर, शिव मंदिरात ठीक होता पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता". 


"सेंगोल एका राजाने दुसऱ्या राजाला द्यायची प्रथा असेल. पण इथे राजाचा संबंध येतो कुठे? ही लोकशाही आहे. भारताची जनता राजा आहे. पंतप्रधानांनी जे काही केलं ते मनाला वेदना देणारं होतं. तुम्ही संसद भवन बांधलं, त्यात सुविधा दिल्या, ते बरोबर आहे. लोकसंख्येप्रमाणे सभासद वाढणं हेदेखील योग्य आहे. पण ज्याप्रकारे तुम्ही प्रत्येकवेळी विरोधकांना डावलता ते योग्य नाही. हे लोकशाहीचं मंदिर आहे. आपण सर्व धर्मीय, जाती, पंथाना घेऊन चालणारं  आपलं संविधान आहे. आपण जे करत आहोत, ते जगही पाहत आहे. हा एवढा चांगला कार्यक्रम त्यांना करता आला असता, पण काय करणार?," असं ते हताशपणे म्हणाले.