मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचा इतिहासाचा साधा उल्लेखही नसल्यामुळे आता वेगळ्याच राजकीय चर्चांनी आणि आरोप- प्रत्यारोपाच्या सत्रांनी डोकं वर काढलं आहे. ज्यामध्ये सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. यामध्ये शरद पवारांनीही त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधासभा निवडणुकांच्या प्रचारसभेदरम्यान पवारांना त्यांचं मत मांडलं. ट्विट करतही त्यांनी ही बाब मांडली. सरकारच्या भूमिकेला दुटप्पीपणा म्हणून संबोघत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्याच वक्तव्यांमध्ये दिसणारी तफावत सर्वांच्या लक्षात आणून दिली. 


'महाराष्ट्राच्या नव्या पिढीतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजावे म्हणून इयत्ता चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. महाराजांच्या चरित्रामधून नव्या पिढीमध्ये जिद्द निर्माण करण्याची भूमिका पूर्वीच्या सरकारची होती. आता मात्र हा इतिहासच पुस्तकातून काढण्याचा निर्णय या सरकारने घेतला आणि जनतेला सांगतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून हे राज्य पुढे घेऊन जाणार आहोत, हा दुटप्पीपणा आहे', असं ट्विट करत त्यांनी सध्याच्या सरकारी धोरणांवरच निशाणा साधला. 




विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार सध्या विविध ठिकाणी स्वत: जातीने उपस्थित राहत प्रचारांच्या रणधुमाळीत सहभागी झाले आहेत. विविध मार्गांनी पवार सत्ताधारी भाजपाची धोरणं, योजना आणि इतरही मुद्द्यांच्या बळावर मतदारांची मनं जिंकण्याच्या प्रयत्नांत असल्याचं पाहायला मिळत आहे.