राज्यपालांच्या विरोधात शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र
राज्यपालांच्या पत्रातील भाषा वाचून पवारांना आश्चर्य
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरु प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना नेत्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात पत्र लिहिले आहे. राज्यपालांच्या पत्रातील भाषा वाचून आपल्याला धक्का बसला आणि आश्चर्य वाटल्याचे पवार म्हणाले.
राज्यपालांना राज्य सरकारला एखादी गोष्ट सांगण्याचा अधिकार नाही पण त्यांच्या पत्रातील भाषा वाचून मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटल्याचे पवार म्हणाले.
तुम्ही ज्या धर्मनिरपक्षेतचा तिटकार करत होतात ती धर्मनिरपेक्षता तुम्ही स्वीकारली आहे का ? या वाक्यबद्दल पवारांनी विशेष चिंता व्यक्त केली आहे.
घटनेच्या उद्देशिकेत सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे. तो सर्वधर्मियाना समान वागणूक मिळावी या उद्देशानं तिथं वापरण्यात आला आहे. मुख्यमंत्री त्याच घटनेच्या आधारे काम करत असतात, मला खात्री आहे तुम्हाला देखील पत्रातील अनियंत्रित भाषा खटकली असेल असे पवार पंतप्रधानांना उद्देशून म्हणाले.
दुर्दैवानं राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राची भाषा एखाद्या राजकीय नेत्यानं वापरलेली भाषा असल्याचे म्हणत पवारांनी पंतप्रधानांकडे खंत व्यक्त केली.