पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज पुण्यात होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘वन मोदीबाग’ याठिकाणी ही बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते दिलिप वळसे पाटील, सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्वाचे म्हणजे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील या बैठकीसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात ते येतात का याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळ हे राष्ट्रवादीतच राहतील, असे सांगत ते पक्ष सोडूणार जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे या बैठकीला भुजबळ उपस्थित राहतात का, याचीच उत्सुकता आहे. भुजबळ यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार अशीच चर्चा होती. तसेच याआधीही सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यावेळी त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. ही माहिती सुप्रिया यांनीच मीडियाला दिली होती. त्यामुळे भुजबळ येणार की दांडी मारणार याची उत्सुकता आहे.


विधानसभा निवडणुकीची तयारी, आघाडीचे जागावाटप, उमेदवार निश्चिती, मित्रपक्षांना सोबत घेण्याबाबतची भूमिका अशा सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. अलिकडच्या काळात पक्षाला लागलेली गळती हादेखील बैठकीतील चर्चेचा विषय असू शकतो. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटीलांसाठी इंदापूरची जागा सोडायची का यावर देखील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, हर्षवर्धन पाटलांचं भाषण ऐकून आश्चर्य वाटले, तसेच दुःखही वाटलं अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलीय. त्यांच्या मनात काही शंका असेल तर त्यांनी आपल्याशी मोकळेपणानं बोलावं. मात्र इंदापूरच्या जागेविषयी निर्णय झालेला नसताना त्यांनी असं बोलायला नको होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.