`मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी सरकार कोसळेल`; भाजपच्या माजी नेत्याचा दावा
पन्नास खोके घेतले आहे मग मंत्रीपद कशाला असे एकनाथ शिंदे सांगत असल्याचाही दावा
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार सत्तेत येऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही पूर्णपणे मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) होत नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. यावरुन विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल असा दावा भाजपच्या (BJP) माजी नेत्याने केला आहे.
"मंत्रीपद मिळण्याबाबत आपसातल्या भानगडीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसून आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल. त्यामुळे हे सरकार कोसळण्याची वेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल," असा घणाघात राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी केला आहे. जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा - भडगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.
जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांमध्येच मंत्रीपदासाठी रस्सीखेच असल्याची टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली. "मंत्री पदासाठी सुरुवातीला अनेक गाड्या भरून मुंबईकडे गेल्या. मात्र आता पन्नास खोके घेतले आहे मग कशाला पाहिजे मंत्री पद असे एकनाथ शिंदे त्यांच्या कानात सांगत आहेत. त्यामुळे आता सर्व गुपचूप बसले आहेत," अशी खोचक टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे.