राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला, शरद पवार गट आता काय करणार? सुप्रिया सुळेंनी जाहीर केला मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला आहे. अजित पवार गटाची पुढची भूमिका काय असेल याबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
NCP Crisis In Maharashtra : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याचा निकाल सात महिन्यात लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळ्यानंतर शरद पवार गटची पुढची रणनिती काय असेल. सुप्रिया सुळेंनी याबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.
निवडणूक आयोगाकडून हाच निकाल अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. जे शिवसेनेसोबत केलं तेच राष्ट्रवादीसोबत केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
अदृश्य शक्तीचं हे यश आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केला तो पक्ष काढून घेण्याचं काम करण्यात आले आहे. मराठी माणसाचा हा पक्ष आहे. मराठी माणसाचा पक्ष संपवण्याचे काम केले आहे. जे षडयंत्र बाळासाहेबांच्या विरोधात झाले तेच आज पवार साहेबांसोबत झालंय. पवार साहेबांनी शून्यातून पक्ष उभा केला. बापाच्या हातातून पक्ष काढून घेण्यात आला आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
आमदारांचं संख्याबळ हा नियम निवडणूक आयोगानं लावला आहे. आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली आहे. हा राजकीय विषय आहे वैयक्तिक विषय नाही. पवारांनी ६० व्या वर्षा पक्ष उभा केला. आता पुन्हा पक्ष उभा करू असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या निवडणूकीसाठी तीन चिन्हाचे नाव देण्याचे आयोगानं सांगितलं आहे लवकरच याबाबतचा निर्णय घेवू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक
निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे . या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय.
राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या
राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख दिलीये... तर आमची मजबुत बाजू असूनही हा निर्णय निवडणुक आयोगाकडून घेण्यात आल्याचं वाईट वाटतं अस जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं, अजित पवारांकडे बहुमत असल्यानं मेरीटवर त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळालं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.