सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या काही तास आधीच नोटीस; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले `लग्नाच्या वाढदिवसाचा...`
Jayant Patil on ED Notice: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. यानंतर जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपण आयुष्यात एकही घोटाळा केला नसून चौकशीला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Jayant Patil on ED Notice: आज राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे असताना सुनावणीच्या काही तास आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली. आयएलएफस प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली असून, जयंत पाटील यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण आयुष्यात एकही घोटाळा केला नसून चौकशीला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
"काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. यादरम्यान संध्याकाळी 6 वाजता मला ईडीने नोटीस पाठवली. पण या नोटीसमध्ये ईडीने मला तसं काही कारण सांगितलेलं नाही. पण त्यातील फाइल क्रमांक काढून पाहिला तर आयएलएफस नावाची कोणती तरी संस्था आहे आणि त्यासंबंधी हे प्रकरण आहे. माझा कधी त्यांच्याशी संबंध आलेला नाही. मी कधीच आयएलएफसकडून कर्ज घेतलेलं नाही. त्यांच्या दारात कधी गेलो नाही. कधी कोणाशी बोललेलो नाही. तरीही नोटीस पाठवण्यात आली आहे," अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
"कालच एका हवालदाराने 6 वाजता येऊन नोटीस दिली. या चौकशीला मी सामोरं जाणार आहे. पण घरात दोन दिवस लग्नसराई आहे. घरातील जवळच्या लोकांची लग्नं आहेत. त्यामुळे मी ईडीकडे दोन दिवस परवानगी द्या असं पत्र पाठवलं आहे," असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाची सुनावणी आहे त्यादिवशीच नोटीस आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले "ईडीची नोटीस कशासाठी येते हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांना सोयीचं वाटतं त्यानुसार ते नोटीस देतात. पण त्या नोटीशीला मी सामोरं जाईन. माझं आयुष्य उघडं पुस्तक आहे. मी कधीच कोणाशी काही चुकीचे व्यवहार केलेले नाहीत, घोटाळे केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारी सर्व माहिती मी देईन. मनी लाँड्रिंच्या कोणत्याच गोष्टी मी केलेल्या नाहीत".
खच्चीकरण करण्यासाठी ही नोटीस पाठवलेली असू शकते. नोटीस पाठवणाऱ्याला हे प्रश्न विचारायला हवेत असं मिश्किल भाष्य त्यांनी केलं.