मुंबई : राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपच्या पाठिंब्याच्या वाटेवर असणाऱ्या अजित पवार यांच्या मनधरणीचे सर्वतोपरी प्रयत्न सध्या सुरु आहेत. सोशल मीडियापासून ते व्यक्तिगतपणे भेट घेत नेतेमंडळी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असणारे पवार कुटुंबीय अजित पवार यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. अखेर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आता एक अखेरचा प्रयत्न म्हणून पवारांच्या मनधरणीची जबबादारी आपल्या हाती घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यास त्यांना पक्षाच्या कारवाईला सामोरही जावं लागू शकतं असा आशय पाटील यांच्या वक्तव्यातून पाहायला मिळाला. 


'मी त्यांना यापूर्वीही भेटलो आहे. यानंतरही अंतिमत: त्यांची समजूत घालण्यासाठी जाणार आहे. शेवटी ५४ आमदार कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. यश आलं तर ठीक, नाहीतर पक्षाचा निर्णय सर्वमान्य असेल' असं जयंत पाटील म्हणाले.


बहुमतासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडे पुरेसं संख्याबळ असण्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आपले सर्व आमदार सदनात हजर करण्याचाच प्रत्येक पक्षाचता मानस आहे, ज्यासाठीच हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. 



सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या भावनिक आवाहनानंतर खुद्द छगन भुजबळही अजित पवारांच्या भेटीला गेले होते. इतकच नव्हे तर, जयंत पाटील यांनीही त्यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रय़त्न केला होता. पण, आता या अयशस्वी प्रयत्नांना शह देत अखेरचा प्रयत्न यशस्वी ठरतो का आणि अजित पवार पक्षात परततात का याकडेच साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.