अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवारांनी गुंड गजा मारणेची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार गजा मारणेच्या भेटीला पोहोचले होते. पार्थ पवार यांच्यासोबत यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान गजा मारणेची पत्नी जयश्री उपस्थित होत्या.
कोण आहे गजा मारणे?
गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील गावात झाला आहे. शास्त्रीनगरमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला होता. कोथरुड आणि पुणे शहरात मारणे टोळीची दहशत आहे. घायवळ गँग आणि मारणे गँग यांच्यातील वर्चस्वाचा वाद सर्वश्रुत आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणी गजा मारणेला अटकही झाली होती. या प्रकरणी तो 3 वर्षं येरवडा जेलमध्ये होता.
गजा मारणेविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील एका व्यावसायिकाकडे 20 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कोर्टाने त्याला गतवर्षी जामीन मंजूर केला होता.
गजा मारणेची पत्नी जयश्री या राजकारणात असून त्या मनसेच्या नगरसेविका होत्या. पार्थ पवारांनी गजा मारणे आणि जयश्री यांची भेट घेतल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, खळबळ उडाली आहे. फोटोमध्ये गजा मारणे, पत्नीसह पार्थ पवार यांचा सत्कार करताना दिसत आहे.
या भेटीदरम्यान शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेवक दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते. पार्थ पवारांच्या भेटीमुळे कोथरुडमधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत आहेत.