Amol Mitkari Tweet: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी 'बीडच्या बप्पाचा दादांना फोन' असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonavne) यांच्याकडे आहे. बजरंग सोनावणे यांनी बीडमधून भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला आहे. दरम्यान त्यांनी अजित पवारांशी संवाद साधल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सविस्तर माहितीही दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातील काहीजण जेव्हा आमचं भविष्य कसं अशी गळ घालतात तेव्हा माझ्याारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो.  मी त्या नेत्यासोबत काम करत आहे जे नेते महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेऊन तळागळातील लोकांचं काम करतात. आज सकाळी 7.30 ला फोन आला होता. हा फक्त ट्रेलर आहे. तेथील तथाकथित नेत्याने दादा गटातील काही नेते आमच्या गटात येतील अशी भविष्यवाणी केली होती. पण त्यांनी तुतारीचे खासदार सांभाळून ठेवावेत," असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. सध्या एक तरी गळाला लागल्यासारखा दिसत आहे. लवकरच मोठा पिक्चर दिसेल असा दावाही त्यांनी केला आहे. 



पुढे ते म्हणाले की, "दादांच्या कामाबाद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. बारामतीच्या विकासात साहेबांप्रमाणे अजितदादांचाही वाटा आहे. ही निवडणूक विकासापेक्षा भावनिकतेवर गेली त्यामुळे पराभव स्विकारावा लागला. आमच्यासाठी हे अनपेक्षित होतं. पण आम्ही हिरीरीने काम करणार आहोत. पण अजित पवार राज्यात केंद्रस्थानी असणारे किती महत्वाचे नेते आहेत हे सिद्ध होत आहे. एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असले आणि तो दुसऱ्या गटाचा खासदार अजित पवारांना फोन करुन विनंती करत असेल तर आमच्यासाठी भूषणाह बाब आहे". 


"विरोधक आता यावर काय स्पष्टीकरण देतात याची आम्ही वाट पाहत आहोत. आमचं चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे कॉल डिटेल्स काढावेत. दुपारी 2.30 वाजताही फोन आला असं मला समजत आहे. विधानसभेच्या पूर्वी महाराष्ट्रात फार मोठ्या घडामोडी दिसू शकतात," असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. कदाचित झाली चूक पदरात घ्या हे सांगण्यासाठी फोन आला असावा असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. 


विधानसभेच्या आधी या घडामोडी वाढतील. विधानसभेत अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, मराठा, ओबीसी अशा सर्व समाजाला न्याय दिला जावा अशी आमची भूमिका आहे. विधानसेच्या आधी आमच्याकडे तरुणांचा भरणा दिसेल असंही ते म्हणाले आहेत.