गडचिरोली : जिल्ह्यातील जांभुळखेडा-लवारी गावादरम्यान करण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटात एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कैलास रामचंदानी असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ३० एप्रिलच्या रात्री नक्षलींनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने आणि यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर १ मे रोजी जाभूळखेडा-लवारी गावादरम्यान भूसुरुंगस्फोट घडवून आणला. यात १५ पोलीस आणि एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना अचानक मोठं यश मिळालं. सुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी आणि सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली होती.


 पोलीस कोठडीदरम्यान या पाच जणांची विचारपूस केल्यानंतर पोलिसांना मोठा मासा गवसला तो होता कैलास रामचंदानी. कैलासचे कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल तसंच इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून, गेल्या काही महिन्यांपासून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कुरखेडा तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी आहे. 


भूसुरुंगस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी अडकल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचा या घटनेत नेमका कसा सहभाग होता, किती दिवसांपासून तो नक्षल्यांच्या संपर्कात होता, याविषयी पोलीस तपास करीत आहेत. 



दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांना विचारणा केली असता, त्यांनी कैलास रामचंदानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे कबुल केले आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वाढवला आहे. त्यामुळे अधिक माहिती हाती येण्याची शक्यता आहे.