शरद पवार (Sharad Pawar) यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीला इशाराच दिला आहे. "सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार", असं शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान शरद पवारांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी 4 ते 6 महिन्यात सरकार बदलायचं आहे असा नारा दिला आहे. त्याबद्दल विचारण्यात आलं असता भुजबळांनी महायुतीला चर्चेचं गुऱ्हाळ सुरु न ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "लवकरात लवकर युतीतील पक्षांनी एकत्रित बसून तिकीट वाटपाचा निर्णय घ्यायला हवं. 70, 80 जागा, बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर जे काय असेल तर लवकर ठरवा. शरद पवार कामाला लागले आहेत. त्यांनी प्रचार सुरु केला असून, तशा प्रचाराला आपण सुरुवात करायला हवी. आपण परत तेच चर्चेचं गुऱ्हाळ सुरु ठेवलं तर अडचणी निर्माण होतील", असा इशाराच भुजबळांनी दिला आहे. 


"मला डावललेलं नाही"


अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याप्रमाणे चालवत आहेत का? असं विचारण्यात आलं असता छगन भुजबळ म्हणाले की, "काल संध्याकाळच्या बैठकीत मी होतो. मला कुठे डावललं आहे". 


'आरएसएसच्या टीकेला उत्तर'


तसंच आरएसएसचं मुखपत्र 'ऑर्गनायझर' मधून अजित पवारांना महायुतीत कशाला घेतलं? अशी विचारणा भाजपाला केली आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की, "त्यांनी अनेकांवर टीका केली आहे. काही लोकांनी तर काँग्रेसचे लोक का घेतले अशीही टीका केली आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना घेतलं आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. पण हे तुम्ही महाराष्ट्रातील सांगत आहात. मग भारतातील इतर ठिकाणी काय झालं? तिथेही तुम्हाला धक्का बसला आहे. म्हणून नितीश कुमार. चंद्राबाबू यांना एकत्र घेऊन सरकार स्थापन करावं लागलं आहे".


"मीदेखील राज्यसभेसाठी इच्छुक होतो"


"मीदेखील राज्यसभेसाठी इच्छुक होतो. माझ्यासह आनंद परांजपे, बाबा सिद्धिकी असे अनेकजण इच्छुक होते. पण चर्चेअंती अखेर सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांनी काहीच म्हटलेलं नाही. कोअर ग्रुपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा अजित पवारांचा नसून, सर्वांचा निर्णय आहे," असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.