नागपूर : राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या हल्लाबोल मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. 


वेगवेगळ्या ठिकाणाहून मोर्चाची सुरूवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचा अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वातला मार्चा धनवटे कॉलेजपासून निघाला. तर काँग्रेसच्या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी दिल्लीतून गुलामनबी आझाद येत आहेत. काँग्रेसचा मोर्चा दीक्षा भूमीपासून निघालाय. दोन्ही मोर्चे विधीमंडळजवळच्या मोर्चा पाईंटवर एकत्र येतील. तिथेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सभा घेतील.


धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका


आम्ही शेतकर्‍यांची बाजू मांडत असताना मुख्यमंत्री सांगत होते मी पाच पिढ्यांच्या शेतकरी आहे. तुम्ही सर्व बाजूने मुख्यमंत्र्यांना बघा ते शेतकरी वाटतात. मुख्यमंत्री म्हणतात मी गाईचे दूध काढले आहे. मला साहेब परवानगी द्या मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गाय घेऊन जातो मुख्यमंत्र्यांनी दुध काढून दाखवावे. मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही १५ वर्ष काय केलं. मी म्हणतो तीन वर्षापूर्वी जनतेने तुमचे लग्न सत्तेशी लावले मग तुम्हाला जनकल्याणाचे पोर होत नाही त्याला आम्ही काय करणार. तुम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणावे की देवेंद्र फसवणीस? सगळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.


दुस-या दिवशीही अधिवेशनात गोंधळ


दरम्यान, तिकडे विधीमंडळात आजही विरोधक आक्रमक झालेत. विधानसभेतही गोंधळ झाल्यानं कामकाज १० मिनिटं तहकूब करण्यात आलंय. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा एकदा गोंधळ झाला. त्यामुळे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं. दुपारी साडे बाराला कामकाज सुरू झालं. पण गोंधळ कायम राहिला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.


सरकारविरोधी घोषणाबाजी


विधानसभेत गदारोळानंतर पाऱ्यांवर सरकारविरोधी घोषणा बाजी करण्यात आली. तिकडे विधानपरिदषेतही हीच परिस्थिती होती. दुपारी एक वाजेपर्यंत गोंधळामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं. पण गोंधळ कायम राहिल्यानं विधानपरिषदेही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.