मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे आपल्या कणखर नेतृत्वासोबतच आपल्या भाषण आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. विरोधकांचा कमी शब्दात जास्त अपमान करण्याची कला त्यांच्याकडे असल्याने ते तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशावेळी वॅलेंटाईनडेचे औचित्य साधून धनंजय मुंडे यांनी भाजपा-शिवसेनेच्या प्रेमावरुन त्यांना कोपरखळी मारली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्वीट करत ''यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का?'' असा मिश्किल प्रश्न उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लोकसभा निवडणूका काही महिन्यांवर आल्या आहेत. देशभरात भाजपा विरोधी वातावरण तयार करत विरोधकांनी एकत्र येण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपले जुने रुसवे फुगवे विसरुन भाजपा विरोधात एकत्र लढण्याचा पण घेतला आहे. एकत्र लढण्यातच समजदारी आहे हे दोन्ही पक्षांना एव्हाना कळून चुकलंय. पण भाजपा-सेनेच्या युती बाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट होत नाही आहे. दरवेळेस एकमेकांच्या पक्षावर आणि त्यांच्या धोरणांवर टीका करायची आणि निवडणूक आली की युती करायची हा सेना-भाजपाचा अलिखित नियम आजपर्यंत सर्वांनी पाहीला आहे. अजूनही जागावाटपावरून युतीचं घोडं अडलेलं पाहायला मिळंतय. पण हा सर्व दाखवण्याचा खेळ असून युती होणार असे विरोधकांना वाटत असून त्यांनी एकत्र येत संभाव्य युतीशी लढण्याची रणनीती आखली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते नेहमी भाषणातून भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत असतात.  यामध्ये आता धनंजय मुंडेही कुठे मागे राहीले नाहीत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेले धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या खास शैलीत उत्तर दिले होते. बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. 



धनंजय मुंडे देखील आपल्या भाषण आणि माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून भाजपा तसेच युतीवर तोंडसुख घेत असतात. आता तर त्यांनी आपल्या ट्विटरवरवरून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचा स्मितहास्य करतानाचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काहीतरी सांगत आहेत. धनंजय मुंडे यांनी या दोघांचा बेस्ट कपल असा उल्लेख ट्वीटरवरून केला आहे. ते एवढ्यावरंच थांबले नाहीत तर पुढे म्हणतात, ''गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच... केवढा तो एकमेकांवर जीव... नाही का ?'' असा टोलाही मुंडे यांनी लगावला आहे. 



मुंडे यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहे. मुंडेंच्या समर्थकांनी तर ते रिट्वीट करण्यास सुरूवातही केली. सोबत फेसबुक, व्हॉट्सअॅप ही पोस्ट एकमेकांना पाठवूही लागले आहेत. त्यामुळे आजचा 14 फेब्रुवारी हा दिवस तरुण-तरुणींसाठी प्रेम दिवस म्हणून लक्षात राहील तसा राजकारण्यांना आपल्या व्यस्ततेतही वॅलेंटाईनची आठवण करुन देणारा नक्की असेल.