जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, ठाण्याला जात असताना पोलिसांसमोरच गाडी फोडली
Jitendra Awhad Car Attacked: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना गाडीवर हल्ला करण्यात आला आहे
Jitendra Awhad Car Attacked: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Sanghatna) कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच रक्त हिरवा आहे अशा पद्धतीची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी मांडली होती. याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताफ्यासह ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर बांबूने हल्ला कऱण्यात आला. यावेळी गाडीची काच फोडण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा हल्ला कऱण्यात आला.
आव्हाडांनी काय विधान केलं होतं?
संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती.
“संभाजीराजेंना छत्रपती म्हणणं सोडून द्या. कारण त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंशपरंपरा होती, ज्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते त्या रक्तात काय होतं आणि यांच्याकडे काय? हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस असं वक्तव्य करतो ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
स्वराज्य संघटनेने स्विकारली जबाबदारी
स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी व्हिडीओ शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्विकारत असल्याचं म्हटलं आहे. सबुरीने राहा अन्यथा येणाऱ्या कालावधीत महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल असा इशाराही त्यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे. तसंच महापुरुषांविषीय बेताल विधान करणं टाळावं असा सल्ला दिला आहे.
"या महाराष्ट्रभरात गेल्या 25 वर्षांपासून मला कोणी हात लावू शकत नाही, धमकावू शकत नाही, माझ्यापर्यंत कोणी येऊ शकत नाही या आर्विभावात मुस्लीम मतांच्या लालसेपोटी, मुंब्र्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी आमचे मार्गदर्शक, पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी बेताल वक्तव्य केलं होतं. आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईत फटकावण्याचा प्रयत्न केला. त्याची गाडी फोडली आहे. जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळाला आहे. दम होता तर त्या ठिकाणी थांबायचं होतं. महापुरुषांविषयी बोलू नको, महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत करु नकोस. सबुरीने राहा अन्यथा येणाऱ्या कालावधी महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल," असं ते म्हणाले आहेत.