मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे. ऐन कापणीला आलेली पिकं उध्वस्त झाल्यामुळं जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढं उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सकाळपासूनच त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात झाली. या दौऱ्यात रुपरेषेप्रमाणं ते थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. पवारांच्या या दौऱ्यात तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद इथं ते भेट देणार असून, टप्प्याटप्पायानं त्यांनी गावागावांमध्ये जात शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्याचं पाहायला मिळालं. 


सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत अक्षरश: काही ठिकाणी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला घेराव गालत आपल्या समस्या त्यांच्या कानी घातल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे गावागावांतून निघालेल्या पवारांनीही शेतकऱ्यांसाठी वेळ काढत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. शिवाय झालेल्या नुकसानाचा आढावा घेत परिस्थितीवर नजर टाकली. त्यांनी जातीनं या प्रकरणात लक्ष घातल्यामुळं मदत मिळण्याबाबत बळीराजाही आशावादी असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता शरद पवार थेट पंतप्रधानांची भेट घेणार असून, किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत. तेव्हा आता या संकटानं खचून जाऊ नका असं  आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. 


अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान भरपूर आहे. त्यामुळं एकट्या राज्याला मदत देणं कठिण असल्यामुळं केंद्रानंही या बाबतीत मदतीचा हात पुढं करावा, असं पवार यावेळी म्हणाले. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस दौरा करत आहेत. राज्यात कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा प्रमाणात परतीच्या पावसामुळे भातशेती आणि पिके तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.  


 


दरम्यान, दुसरीकडे शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा पीक नुकसान पाहणी दौऱ्यावर असतील. एकंदरच राज्यात येत्या काही दिवसांमध्ये राजकीय दौऱ्यांचं सत्र पाहायला मिळणार आहे.