ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन करणा-यांना पवारांनी फटकारले
ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन करणार्यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी फटकारले आहे.
सांगली : ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन करणार्यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी फटकारले आहे.
‘दुधात कोणी मिठाचा खडा टाकू नये. आज काही जण ऊस तोड बंद पाडत आहेत. पण ऊस शेती काय टाटा-बिरलाची नाही, ऊस शेती ही शेतकऱ्यांची आहे, हे आंदोलन करणार्यांनी लक्षात ठेवावे’, असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लगावला आहे.
सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे शेतकरी मेळाव्यात पवार हे बोलत होते. यावेळी सहकारी क्षेत्रात देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या क्रांती साखर कारखान्याचे प्रमुख अरुण अण्णा लाड यांचा, शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऊसाच्या दरावरून शेतकरी संघटना विरुद्ध सरकार आणि साखर कारखाने असा संघर्ष चिघळण्याची चिन्हं आहेत. ऊसाला 3500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.
तर ऊसाच्या भावावरून सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातच एकवाक्यता नाही. त्यामुळे ऊसदर ठरवण्यासाठी बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णयच होऊ शकलेला नाही. आता येत्या ८ नोव्हेंबरला पुढील बैठक होणार आहे.