मुंबई : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांनी रात्री फोन करुन राजभवनात घेऊन गेले आणि हा शपथविधी पार पडला. यानंतर राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले. यावेळी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांपैकी काही आमदार उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो भाजपाच्या कोणत्या सभेत जाणार नाही. आपल्या देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व संकटात येईल. जनमत ते भाजपाच्या विरोधात असल्याने त्यांना मतदारसंघातील सामान्य माणूस त्यांना पाठींबा देणार नाही अशी कडक शब्दातील तंबी शरद पवार यांनी दिली. 


सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा निवडणुक झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढून त्यांचा पराभव करेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. 



राष्ट्रवादी आमदारांच्या सह्यांची यादी आमच्याकडे होती. या सह्या पाठिंब्यासाठी नव्हत्या. या ५४ आमदारांच्या सह्या सादर केल्या असतील तर ही राज्यपालांची फसवणूक झाली असे मला वाटते. 


काल रात्री १२ वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर महत्त्वाचे काही बोलायचय तुम्ही या असे अजित पवारांनी सांगितले. अर्धा तास थांबल्यानंतर मुंबईत एका ठिकाणी चर्चेला जायचय असे सांगण्यात आल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले. त्यानंतर आम्हाला राजभवनात नेण्यात आलं. आम्हाला कोणालाही याची पुसटशी कल्पना नव्हती असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 


तसेच  हा सर्व शपथविधी झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि शरद पवार यांच्यासोबतच राहायचं हे आम्ही ठरवल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. 


आम्हाला काहीही कल्पना नव्हती आणि अचानक समोरच्या भाजपा नेत्यांना बघून आमचा रक्तदाब वाढला होता असे विक्रमगडचे आमदार अविनाश भुसारा यांनी स्पष्ट केले.