१८ तारखेला मोठी घोषणा करणार; अमोल कोल्हेंची पोस्ट
विधानसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जाहीर सभांना मागणी होती.
मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अभिनेता डॉ. अमोल कोल्हे लवकरच मोठी घोषणा करणार आहेत. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली. १८ डिसेंबरला आपण एक मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
डॉ. अमोल कोल्हेंची सध्या स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका लोकप्रिय आहे. तर दुसरीकडे ते शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले असल्याने काही राजकीय विषयावर बोलणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तर ही जणांनी अमोल कोल्हे हे कॅबिनेट मंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव शिवाजीराव पाटील यांचा पराभव केला होता.
सावकरांविषयीच्या अपमानजनक वक्तव्यानंतर विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली होती. या यात्रेचे नेतृत्व अमोल कोल्हे यांनी केले होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जाहीर सभांना मागणी होती. त्यांनी अक्षरश: महाराष्ट्र पिंजून काढला होता. निवडणुकीत राष्ट्रवादीला याचा चांगलाच फायदा झाला होता.
दरम्यान, गेल्या काही काळापासून अमोल कोल्हे यांनी बैलगाडी शर्यत आणि गड किल्ल्यांचा विषय लावून धरला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार याबाबत काही मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता अनेकजणांकडून वर्तविली जात आहे.