`तुमच्याच भावाच्या पोटी जन्माला आलोय ना`, अजित पवार पक्ष चोरला टीकेमुळे संतापले, `वरिष्ठांचा मुलगा असतो तर...`
केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय दिला आहे. यानंतर पक्ष चोरला अशी टीका करणाऱ्यांवर अजित पवार संतापले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय दिला आहे. यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान पक्ष चोरला अशी टीका करणाऱ्यांवर अजित पवार संतापले आहेत. निवडणूक आयोगाने, विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली होती. प्रतोदच आमच्या बाजूने आहे. मग अशी बदनामी का केली जात आहे? अशी विचारणा त्यांनी केली आहे. तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना असं सांगत त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.
पक्ष चोरला अशी टीका करणाऱ्यांवर संतापलेले अजित पवार म्हणाले की, "वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर ते चांगलं. आम्ही झालो तर निव्वळ बेक्कार. पक्ष चोरला असं म्हणतात. निवडणूक आयोगाने, विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली होती. प्रतोदच आमच्या बाजूने आहे. मग अशी बदनामी का केली जात आहे. म्हणजे वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं. पक्ष माझ्या ताब्यातच आला असता. तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना".
पुढे ते म्हणाले की, "म्हणून मी सांगत आहे की कोणीही फोन केला तर तुम्ही भावूक होऊ नका. आम्हाला 15 वर्षात फोन नाही आला तो आता येत असल्याचं सांगत आहेत. तुमच्यासाठी केलेलं सगळं विसरुन जात असाल तर ते बरोबर नाही". मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही महायुती केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
जिवाचं रान केल्यानंतरही काहीजण एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं कुटुंब सोडलं तर सगळे माझ्याविरोधात प्रचार करतील असंही अजित पवार म्हणाले.
"मी खोटं बोलत नाही. मी थोडा कडक शिस्तीचा आहे. पण काम चोख करुन घेतो. आपण अनेकांना संधी दिली असून, त्यांनी संधीचं सोन केलं. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं की बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता आपला कणा आहे. तुमच्या आजुबाजूला बसलेला आम्हाला मदत करत नाही अशी तक्रार केली जाते. प्रत्येकाचं बोलणं, करणं प्रत्येकाला आवडेल असा माझा दावा नाही. माझ्यावरही काहीजण समाधानी नसतील. पण आपण प्रत्यकेजण समाधानी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे," असं आवाहन यावेळी अजित पवारांनी केलं.
"65 आमदार आम्ही एकत्र आहोत. त्याच्यातील जवळपास 50 ते 52 आमदार एका बाजूला 13-14 आमदार एका बाजूला आहेत. वरिष्ठांनी पक्ष स्थापन केला तेव्हा त्यात अनेक नेते होते. सगळ्यांना प्रयत्न केला. 25 वर्षात घड्याळ, झेंडा, पक्षाची भूमिका दूरपर्यंत नेली. शेतकरी, दुध उत्पादक, कांदा शेतकरी सर्वांसाठी काम केलं," असं अजित पवार म्हणाले.