पक्ष फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल! बंडखोरीनंतरच्या पहिल्या भाषणात पवारांचा हल्लाबोल
NCP President Sharad Pawar Full Speech From Priti Sangam Karad: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर पक्षातील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं.
NCP President Sharad Pawar Full Speech: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या भाषण करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरीवर सूचक पद्धतीने विधान केलं. भारतीय जनता पार्टीचा थेट उल्लेख टाकळत राज्यामध्ये मागील काही काळापासून जातीयवादी दंगली घडवण्याचा प्रयत्न झाल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांनी पुढील सहा महिने एका वर्षात सर्वांना जनतेसमोर जायचं असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला.
चव्हाणसाहेबांचे विचार तुमच्या आमच्या मनात
"सामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार हा जतन केला पाहिजे. देशाच्या विकासामध्ये सर्वसामान्यांचा हातभार लागला पाहिजे. त्यांनी या राज्यांमध्ये नवीन पिढी तयार केली. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तरुणांचा संच उभा केला. त्या माध्यमातून महाराष्ट्रातून प्रगती पथावर नेला. चव्हाणसाहेब आज नसले तरी त्यांचे विचार तुमच्या माझ्या मनात आहेत," असं म्हणत शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केलं.
समाजविघातक प्रवृत्तीविरोधात उभं राहण्याची गरज
तसेच पुढे बोलताना, शरद पवारांनी, "महाराष्ट्र हे बंधुत्व, इमानदारीचं पुरस्कार करणारं राज्य आहे. पण मध्यंतरीच्या काळात संगमनेर, अकोला असो अशी काही ठिकाण आहेत ज्यांची नावं घेता येतील तिथे पिढ्या अन् पिढ्या एकत्र राहणाऱ्यांमध्ये एकप्रकारची वैर भावना वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि जातीय दंगली झाल्या. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. पण केवळ असं म्हणून भागणार नाही. या समाजविघातक प्रवृत्तीविरोधात उभं राहण्याची गरज आहे. तेच काम आपण महाराष्ट्रात करत होतो," असं म्हणत पुढे शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख केला.
उद्धव ठाकरे सरकारचा उल्लेख
"एक काळ असा येऊन गेला की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्राची सेवा करत होते. आज तेच सरकार या ना त्या पद्धतीनं उलथून टाकण्याचं काम काही लोकांनी केलं. हे काम देशातील अनेक राज्यांमध्ये केलं. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चालेलं राज्य उलथून टाकलं आणि तिथे जातीय संघीय वृत्तीला प्रोत्साहन देणारं राज्य सत्तेत आणलं. दिल्ली, पंजाबमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, हिमाचलमध्ये, उत्तरखंडमध्ये आहे अनेक राज्यांमध्ये इतरांचं सरकार आहे. चुकीच्या प्रवृत्तींमुळे एक प्रकारचा संघर्षाचा काळ आहे. चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या राज्यांमध्ये लोकशाही पद्धतीने काम करत राष्ट्रीय पक्षाला झटका देण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न आणि त्यासंदर्भातील भूमिका एकच आहे, हा जो जातीय विचार आहे त्यामधून देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न या सर्व घटकांचा आहे. महाराष्ट्रातील उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृ्त्तीने घेतली. दुर्देवाने तुमच्या आमच्यातील काही सहकारी याला बळी पडले. पण ठीक आहे. एखादी व्यक्ती बळी पडले असेल, समूह बळी पडला असेल तर शाहू-फुले-आंबेडकर आणि चव्हाणांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण तो महाराष्ट्राची सामुहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
शांततेवर विश्वास असणारा वर्ग नक्कीच अशा प्रवृत्तींना धक्का देईल
"उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याला फार अवधी नाही. वर्ष सहा महिन्यामध्ये पुन्हा एकदा लोकांसमोर जायची संधी येईल. त्यावेळेला ही राज्या राज्यातील लोकशाहीच्या वर्गाकडून, शांततेवर विश्वास असणाऱ्या वर्गाकडून या शक्तीला धक्का दिला जाईल. या प्रवृत्ती पूर्णपणे बाजूला करुन महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर, कष्ट करणाऱ्यांचं राज्य म्हणून आपण निर्माण करु," असंही पवार भाषणाच्या शेवटी म्हणाले.