Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे क्रिकेट खेळत नसलो तरी गुगली कसा आणि कुठे टाकायचा हे माहिती होतं असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आमची बैठक झाली आणि दोन दिवसांनी भूमिका बदलली असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी तर जाहीर बोललो होतो की, तुम्हाला सरकार बनवण्यास लोक कमी पडत असतील तर बाहेरुन राष्ट्रवादी पाठिंबा देईल. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मी हे सांगितलं होतं. नंतर द्यायची वेळ आली नाही. त्यांचं फार कौतुक होतं असं काही नाही. त्यांच्या आणि त्यांच्या मित्रांमध्ये अंतर कसं पडेल याची काळजी घ्यायची होती. तो त्या काळचा प्रश्न होता," असं शरद पवारांनी सांगितलं. 


पुढे ते म्हणाले की, "ते भेटले ही गोष्ट खरी आहे. चर्चा झाली हेदेखील खरं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की, मी दोन दिवसांत धोरण बदललं. जर मी धोरण बदललं तर त्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं. ती शपथदेखील अशी चोरुन का पहाटे घेतली. जर आमचा पाठिंबा होता तर दोन दिवसांत सरकार कोसळलं कसं? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. त्यांना राजीनामा द्यावा लागला याचा अर्थ सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो त्यांची ही भूमिका समोर आणण्यासाठी यादृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या". 


"उद्या मी तुम्हाला राज्यपाल करतो, शपथ घ्यायला या सांगा तर येणार का? मोदींचा यामध्ये काही संबंध नव्हता. कारण सत्तेत नसल्याने करमत नसणारे मोदी नव्हते. ते राज्यातील होते," असा टोला शरद पवारांनी लगावला. "आम्ही सत्तेतसाठी किती अस्वस्थ आहोत, त्याच्याशिवाय जगू शकत नाही हे महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं होतं," असंही त्यांनी सांगितलं.


"आमच्या बैठकीत सर्व चर्चा झाल्या होत्या. पण तीन दिवसांपूर्वी जर आम्ही माघार घेतली तर शपथ का घेतली? आता मी टाकलेला डाव होता की नाही हे माहिती नाही. तुम्ही काय ते ठरवा," असं ते म्हणाले.


"माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सदाशिव शिंदे. ते देशातील उत्तम गुगली गोलंदाज होते. मोठमोठ्या लोकांचे त्यांनी विकेट घेतले होते. आणी मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे क्रिकेट खेळत नसलो तरी गुगली कसा आणि कुठे टाकायचा हे माहिती होतं. आता विकेट दिली, तर करायचं काय. विकेट घेतलीच पाहिजे," असा टोलाही शरद पवारांनी लगावला. फडणवीस काहीही म्हणत असले तरी आपली विकेट गेली हे सांगत आहेत का? अशीही विचारणा त्यांनी केली. 


शरद पवारांनी आमचा डबलगेम केला - देवेंद्र फडणवीस 


"शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विश्वासात घेऊनच केला. मात्र शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडवरच तीन चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी माघार घेतली. त्यांनी आमचा वापर करून घेतला. शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली. एकाप्रकारे त्यांनी आमचा डबलगेम केला," असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.