Sharad Pawar on Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी ठाण्यात (Thane) शिंदे गटाकडून (Shinde Faction) आपला पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं असून शिंदे गटाकडून कळवा, मुंब्र्यामधील नगरसेवकांना करोडोंची ऑफर दिली जात असल्याचा दावा केला आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या या दाव्यांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 


आव्हाडांनी काय आरोप केला आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला 1 कोटी देतो, तुझ्या पत्नीला 1 कोटी देतो अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला 10 कोटी रुपयांची कामे...ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत," असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 



"माझा बंधुतुल्य सहकारी जितू पाटील जो मागच्या निवडणूकीत निवडून आला होता, त्याला वेगवेगळी आमिष दाखवून पैसेवाल्यांच्या सेनेत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता मोरयासारखे जाऊन तिथे 4-4 तास त्याच्या घरी बसाल, तर तो काय घरातून हालकून देईल पण आपण किती वेळ कोणाच्या घरी बसावं ह्याची तर लाज बाळगा. लोचटासारखे किती वेळ बसाल," असा संतापही आव्हाडांनी व्यक्त केला आहे.


"सगळेच धंदा करायला बसलेत आणि स्वतःचा विक्रीचा रेट लावतायेत असे समजू नका. काही स्वाभिमानी माणसं सुद्धा ह्या जगात जिवंत आहेत. पैशाने सगळ्यांनाच विकत घेता येतं हा डोक्यातला भ्रम काढून टाका," अशा शब्दांत आव्हाडांनी सुनावलं आहे. 



शरद पवारांची प्रतिक्रिया


शरद पवारांना जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले "अनेक ठिकाणी मुख्य पक्ष फोडून अनेकांना दुसरीकडे घेऊन जात आहेत. पण याचा फारसा विचार करायचा नसतो". लोकप्रतिनिधी फोडण्याची पावलं शिंदे गटाकडून जास्त दिसत आहेत. पण हे घडत असतं, त्याची जास्त काळजी घेण्याची गरज नाही असं ते म्हणाले. 


दरम्यान फडणवीस-अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी "शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली कशाला काढायचा तो प्रश्न", असं सांगत जास्त भाष्य करणं टाळलं. 


सी-व्होटरच्या सर्व्हेवर भाष्य करताना शरद पवारांनी "सत्ताधारी मंडळींच्या विरोधात जनमत आहे, सर्व्हेमधून असंच दिसत आहे," असं म्हटलं. विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न आहे पण अजून कोणताही पक्का निर्णय झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आगामी निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. आमची अजून वंचितबाबत चर्चा झालेली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत असं त्यांनी सांगितलं.
 
नवीन कोण राज्यपाल येणार हे माहीत नाही. पण आताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ती चांगली गोष्ट आहे असा टोला त्यांनी लगावला. मोदींच्या बाबतीत बनवलेल्या माहितीपटावर बंदी ही लोकशाहीवर हल्ला आहे अशी टीकाही त्यांनी केली.