राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार बारामती लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार सलग चार दिवस विधानसभा मतदारसंघात बैठका घेणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या सध्याच्या स्थितीचा घेणार आढावा घेतील. तसंच लोकसभा निवडणुकीसाठी नेमकी काय स्थिती आहे याचीही माहिती घेतील. 


शरद पवार पहिल्या  दिवशी 15 फेब्रुवारीला बारामतीत आढावा बैठक घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारीला दौंड मतदारसंघाची बैठक घेतील. यानंतर 17 फेब्रुवारीला इंदापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा, 18 फेब्रुवारीला पुरंदरला जाहीर सभा होईल. नंतर 19 फेब्रुवारीला पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. 


राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील सहा जागा


राज्यसभेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 15 राज्यातील 56 जागांसाठी हे मतदान होईल. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील 6 खासदारांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहऱ्यांना तिकीट मिळणार हे पाहावं लागणार आहे. 


महाराष्ट्रातल्या राज्यसभा खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपत आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. संख्याबळ नसल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटामसोर मोठं आव्हान असणार आहे. 


राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला मिळालं नवं नाव


निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ अजित पवार गटाला दिल्यानंतर राज्यात दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरु आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं नाव दिलं आहे. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला तीन नावांचे पर्याय सादर केले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं. राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट हे नाव वापरु शकणार आहे. 


शरद पवार गट सुप्रीम कोर्टात


शरद पवार गटाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून ही याचिका दाखल कऱण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने याचिकेच्या माध्यमातून केला आहे. 


शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्रं दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांच्या याचिकेवर न्यायालयाने त्यांची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फी आदेश देऊ नयेत, अशी मागणी करत अजित पवार गटाने यापूर्वी कॅव्हेट दाखल केले होते.